आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटाव्यात पाच रुपयांमध्ये मिळते पिण्याचे शुद्ध पाणी; तीन लाख रुपयांच्या पाणीप्रकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या इटावा ग्रामस्थांसाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारून ग्रामपंचायतीने पाच रुपयांत २० लिटर पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले आहे. या प्रकल्पासह इतर विकासकामांना शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. जलप्रकल्पावर ग्रामपंचायतीच्या वतीने तीन लाख रुपयांचा ग्रामनिधी खर्च करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याचे शुद्ध पाणी अल्पदरात मिळत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 
 
इटावा हे गाव वाळूज एमआयडीसीला लागून आहे. एमआयडीसीतील केमिकल्सचे उत्पादन घेणाऱ्या कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे परिसरातील जलसाठे दूषित झाले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून इटावाच्या ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळत नव्हते. ते उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्याला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीने पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ग्रामनिधीतून तीन लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला. या प्रकल्पातून नाममात्र पाच रुपये दरात ग्रामस्थांना २० लिटर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

थकबाकीदारांसाठी दुप्पट दर : ग्रामपंचायतीचाकर थकवणाऱ्या ग्रामस्थांनाही पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना २० लिटर पाण्यासाठी दहा रुपये दर मोजावा लागणार आहेत. 
 
भूमिगत गटार योजना राबवणार : इटावागावात सांडपाण्याच्या नियोजनासाठी भूमिगत गटार योजना राबवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने एका बैठकीत घेतला. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन तब्बल ३५ लाख रुपयांचा ग्रामनिधी खर्च करणार आहे. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य श्याम बनसोडे, सरपंच दुर्गा दुबे, उपसरपंच केशव गायके, ग्रामविकास अधिकारी बी. बी. गायके, अंकुश काळवणे, काकासाहेब बनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
प्रवेशद्वाराच्या कामाचे भूमिपूजन 
इटाव्यात प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य श्याम बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामावर सुमारे लाख ५० हजार रुपयांचा ग्रामनिधी खर्च केला जाणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...