आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Etiquettes Teaching To Collectors By Ashok Chavhan

कलेक्टरला शिष्टाचाराची शिकवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लोकप्रतिनिधींशीहस्तांदोलन करावे असे परिपत्रक शासनाने काढले असतानाही जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी खुर्चीवरून उठण्याची तसदीही घेतली नाही. मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाण यांनी त्याची आठवण करून दिली. काही शिष्टाचार आहे की नाही, मी लोकप्रतिनिधी आहे, राज्याचा मुख्यमंत्रीही राहिलो आहे, तुम्ही बसून निवेदन घेताहात, असे सांगताच कलेक्टर खुर्चीवरून ताडकन उठले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिल्याने हा मुद्दा येथेच संपला.

काँग्रेसने शुक्रवारी शहागंज येथून मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदवला. प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर चव्हाण त्यांच्या समवेत मोजके पाच जण जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात निवेदन देण्यासाठी गेले. चव्हाण दालनात गेल्यानंतर वीरेंद्र सिंह जागेवरचे हललेही नाहीत. बसल्या बसल्याच त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. निवेदन देण्यासाठी चव्हाण उठले तेव्हाही वीरेंद्र सिंह खुर्चीला चिकटून होते. त्यामुळे चव्हाण यांना काहीसा राग आल्याचे शिष्टमंडळातील काहींनी सांगितले. ‘तुम्हाला शिष्टाचार माहिती आहे की नाही, मी लोकप्रतिनिधी आहे. तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलोय अन् तुम्ही खुशाल खुर्चीवर बसून आहात,’ असे चव्हाण म्हणताच वीरेंद्र सिंह जागेवरून उठले. ‘सॉरी, मी विसरलोच’ असा काहीसा युक्तिवाद त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी निवेदन स्वीकारले.

शिष्टाचार काय म्हणतो?
शिष्टाचारात अधिकाऱ्यांनी कोणाचेही निवेदन उभे राहून घ्यावे, असे म्हटलेले नाही. अधिकारी खुर्चीवर काम करण्यासाठी बसलेला असतो. त्यामुळे निवेदन घेणे हेही एक काम आहे. त्यामुळे अनेक अधिकारी बसूनच निवेदन घेतात. याचा काही आमदारांना राग आल्याने त्यांनी शासनाला सांगून एक परिपत्रक काढायला लावले होते. त्यानुसार लोकप्रतिनिधी कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याशी उठून हस्तांदोलन करावे, त्यांचे निवेदन उभे राहून घ्यावे असे म्हटले होते; परंतु या परिपत्रकाच्या कक्षेत जिल्हाधिकारी येतात की नाही, याची माहिती मिळू शकली नाही. तथापि, सौजन्य म्हणून लोकप्रतिनिधींचे निवेदन उभे राहूनच घेणे अपेक्षित असल्याचे महसूल संघटनेच्या ज्येष्ठ नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.