आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तृतीयपंथीयाच्या कथनाने विद्यापीठातील विद्यार्थी स्तब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समाजाने आमचं माणूसपण, जगणं आणि स्वाभिमान हिरावून घेतला आहे म्हणून आम्हाला मतदान कार्ड नाही, ओळखपत्र नाही, शिक्षण नाही, आरक्षण नाही. आम्ही तृतीयपंथात जन्माला आलो यात आमचा दोष नाही ‘अलग हूँ लेकिन गलत नहीं हूँ’ या हेलावून टाकणाऱ्या सीमा गुरू खुर्शीद नायक यांच्या अनुभवकथनाने विद्यार्थी अंतर्मुख झाले होते. आम्हाला पोकळ सहानुभूती नको, सन्मानाची वागणूक देणारी कृती हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात ‘लिंगभाव आणि सामाजिक बहिष्कृतता : तृतीयपंथीयांचे प्रश्न’ या विषयावर मंगळवारी (ता. २९) अर्थशास्त्र विभागात हा कार्यक्रम झाला. तृतीयपंथीयांचे प्रश्न या विषयावर अनुभवकथन आणि मुक्तसंवाद या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मंडळ दिल्लीच्या सदस्या सीमा गुरू नायक यांनी आपला अनुभवपट सादर केला. त्या म्हणाल्या की, वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षानंतर नैसर्गिक बदल होतात आणि जन्मदाते आईवडील आमच्यासारख्या तृतीयपंथीयांना घराच्या बाहेर काढतात. आईवडिलांनी घराच्या बाहेर काढल्यानंतर त्यांचे नावही लावता येत नाही, स्वत:चा पत्ता नाही. निवारा नाही. समाजही स्वीकारत नाही. माझ्या वाट्यास हे भोग आले. जगण्यासाठी देहविक्री केली. नंतर मुंबईच्या उडान संस्थेच्या संपर्कात आले आणि स्वत:ची नव्याने ओळख झाली. देहविक्री सोडून आरशासारखं स्वच्छ झाले. माझ्यासारख्या इतरांसाठी कामास सुरुवात केली. सर्वाेच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई लढले. न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. मात्र, समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आम्हाला कोणी काम देत नाही, भाड्याने घर देत नाही, शिक्षण नाही. ही बस कोणत्या गावाला जाते, असे विचारले तर ते भलत्याच गाडीत बसवून देतात. पुरुषांचे अत्याचार सोसावे लागतात.

सामाजिक कार्यकर्ता आदेश आटोटे म्हणाले की, एड्स रुग्ण, तृतीयपंथीयांच्या प्रश्नासंदर्भात काम करताना समाज माझ्याकडे संशयाने पाहतो. तुम्ही पॉझिटिव्ह आहात काय? तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येतात. तृतीयपंथी तृतीयपंथीयांच्या पोटातून जन्माला येत नाहीत ते या समाजाचे अपत्य आहेत. इतर अपंगत्व स्वीकारता तसे हेही स्वीकारले पाहिजे, असे नमूद केले. अल्ताफ यांनी आपले अनुभव मांडले. प्रास्ताविकात ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. प्रतिभा अहिरे म्हणाल्या की, भारतीय समाज लिंगभावाधारित वर्तन व्यवहार करतो. तृतीयपंथीयांच्या बाबतीत आपण डोळे झाकून त्यांना बहिष्कृत करतो. देशात ४.९ टक्के असलेल्या या वर्गाला अदृश्य करून टाकले आहे. समाजमन बदलण्याची गरज आहे. प्रा. अश्विनी मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आकाश लोणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. निर्मला जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंकित खरे, संतोष लोखंडे, विकास टाचले, संजय पोळ यांनी सहकार्य केले.

एवढा प्रचंड समाज असतानाही आम्ही बेवारस कसे ठरतो...
महिलांवर अत्याचार झाल्यानंतर जे कलम लावतात ते आमच्या बाबतीत लागण्याची गरज आहे. आम्ही जिवंतपणी तर दररोज मरतोच, परंतु मेल्यानंतर आमचे काय करणार? आम्हाला स्वच्छतागृह नाही, स्मशानभूमी नाही, धर्म नाही, जात नाही. तुम्ही सगळे असताना, एवढा प्रचंड समाज असताना आम्ही बेवारस कसे ठरतो? आम्ही शारीरिक विकलांग असल्याचे मान्य करतो, पण समाजाच्या मानसिक विकलांगतेचे काय? आम्ही मेल्यानंतर आम्हाला बेवारस सोडून देता. आम्हाला आता पोकळ सहानुभूती नको, असेही सीमा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...