औरंगाबाद- युरोपियन युनियनच्या अनुदानातून राबवण्यात येणा-या इरासमस मुंड्स शिष्यवृत्तीचा लाभ भारतातील 70 विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
युफ्रेटस कार्यक्रमांतर्गत स्पेनमधील सँटिऍगो डी कॉम्पोस्टेला हे विद्यापीठ या शिष्यवृत्तीसंदर्भात समन्वयकाची भूमिका पार पाडत आहे. या विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा. एनरिके लोपेज वेलेसो यांनी आज विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधला. या वेळी बीसीयूडीचे संचालक डॉ. के. व्ही. काळे, आंतरराष्ट्रीय संबंध केंद्राचे संचालक प्रा. यशवंत खिल्लारे, प्रा. अनिल कुऱ्हे, लिबरल आर्ट्सचे संचालक डॉ. वि. ल. धारुरकर, डॉ. वाल्मीक सरवदे यांची उपस्थिती होती. प्रा. एनरिके म्हणाले, इरासमस मुंड्स फेलोशिपचा पहिला टप्पा यशस्वीपणे राबवण्यात आला. त्यामुळे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची निवड केली आहे.