आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौताळ्यातील दांडगाई प्रकरणी 15 कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गौताळा अभयारण्यात मुलांनी केलेली दांडगाई त्यांच्यासह अभयारण्यातील कर्मचाऱ्यांच्या अंगलट आली आहे. विभागीय वन्यजीव अधिकारी कमलाकर धांडगे आणि उपविभागीय वन्यजीव अधिकारी पी. व्ही. जगत यांनी गौताळ्यात त्या रात्री अनुपस्थित असलेल्या सर्व १५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या आणि जबाबही नोंदवले. दांडगाई करणाऱ्या मुलांनाही कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या असून या मुलांची सोय औरंगाबादच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच केल्याचे तपासात समोर आले आहे. 
 
“दिव्य मराठी’तून हे वृत्त प्रकाशित होताच वनविभाग खडबडून जागा झाला. गौताळा अभयारण्यातील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह लागले. वनविभागाच्या नियमानुसार गौताळ्यात रात्री थांबण्याची सोय नाही. तेथे तात्पुरती निवास व्यवस्था असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, परंतु जंगलाची आणि वन्यजीवांची काळजी नसलेला मात्र पर्यटनावर भर देणारा हा विभाग अनेक वर्षांपासून पर्यटकांना ४०० ते ६०० रुपये शुल्क घेऊन व्हीआयपी सूट बहाल करत असतो. याच ठिकाणी तरुणांनी मुक्काम केला होता. शिवाय उत्तररात्री जंगलात घुसून आतील फोटो काढले. हे फोटो फेसबुकवर व्हायरल होताच गौताळ्याचा पत्ता मुंबई- पुण्यासह राज्यभरातील निसर्गप्रेमी विचारू लागले. या सर्वच प्रकारामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सध्या येथे कडक सुरक्षा व्यवस्था लावली असून सायंकाळी सहानंतर थांबण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे. 
 
पाणवठे आटले, सावधगिरीचा इशारा 
दरम्यान,प्रचंड तापमानामुळे गौताळ्यातील पाणवठे आटले आहेत. यामुळे पाण्याच्या शोधात प्राणी जंगलातील रस्त्यावर येत असल्यामुळे सध्या तेथे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 
 
कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो 
- वन्य जीव कायदा १९७२ प्रमाणे सूर्यास्तानंतर अभयारण्यात फिरता येत नाही. रात्री फिरण्याची परवानगी दिली नसेल तर त्या मुलांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे होते. मुंबईत फिल्म सिटीत फक्त साप हाताळल्याबद्दल एका अभिनेत्रीला दोन दिवस कारावास भोगावा लागला. हे ताजे उदाहरण आहे. या मुलांसह जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे.
-राजेंद्र धोंगडे, निवृत्त वनअधिकारी वन्यजीव कायदेतज्ज्ञ 
 
मुलांच्या अर्जात रिसर्चचा उल्लेखही नव्हता 
विभागीय वन्यजीव अधिकारी धांडगे यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले की, बातमीमुळे जंगलात सुरू असलेला प्रकार मला कळला. आता अशी दांडगाई करणाऱ्यांची कसून तपासणी होईल. त्या मुलांच्या अर्जांत रिसर्च करण्यास आल्याचा कोणताही उल्लेख नव्हता. दांडगाई करणाऱ्या तरुणांनी प्रत्यक्षात जळगावच्या एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने मुलांची सोय केल्याचे उघडकीस आले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...