आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Mayor Of Aurangabd Anita Ghodile Talk On Amc Election

डिफर पेमेंटने रस्ते करण्याची नवी सुरुवात केली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक
२०१०मध्ये पालिकेत युती सदस्यांची सर्वाधिक संख्या होती. तरीही सत्ता स्थापण्यासाठी नगरसेवकांची कमी होती. काँग्रेसने युतीचा महापौर होऊ नये म्हणून जोर लावला होता. सत्ताधारी विरुद्ध हा संघर्ष होता. निवडणुका झाल्यावर सर्व नगरसेवक शिवसेनाप्रमुखांना भेटायला मातोश्रीवर गेलो होतो. त्या वेळी बाळासाहेबांनी शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. ही भूमिकाच आदेश मानून सर्व स्थानिक पदाधिकारी कामाला लागले. आम्ही विजयी ठरलो. युती आणि पाच अपक्ष यांच्या साहाय्याने मी महापौर झाले.
बालपणी पुण्यात चुलत काकांचा निवडणूक प्रचार करणाऱ्या अनिता घोडेले यांना वडील सरकारी नोकर असल्यामुळे राजकारणापासून दूर राहावे लागले; परंतु विवाहानंतर पुण्याची ही लेक औरंगाबादची सून झाली आणि दोन वेळेस नगरसेवक होत शहराची महापौर होण्याचाही मान मिळवला. मोजक्याच उच्च विद्याविभूषित महापौरांमध्ये अनिता यांचे स्थान आहे. त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत...
अनिता घोडेले, महापौर,शिवसेना : एप्रिल २०१० ते ऑक्टोबर २०१२
मी पुणे विद्यापीठात इकॉनॉमिक्सची पदवी घेतली आहे. लग्नानंतर औरंगाबादेत एमए मराठी केलंय. २००५ मध्ये नक्षत्रवाडी वॉर्डातून पहिल्यांदा निवडून आले. २२०० मतांनी विजय झाला होता. त्या काळात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा हा विक्रम होता. मात्र, २०१० मध्ये हा वॉर्ड एससी राखीव झाल्यामुळे मी नवीन वॉर्डाचा शोध सुरू केला. पक्षाने खोकडपुरा वॉर्ड सुचवला; परंतु ताे अनोळखी होता. यापेक्षा कबीरनगर वॉर्डातून उभे राहण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या संमतीनेच ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत अवघ्या २०० मतांनी विजय झाले.

शिवसेना प्रमुखांनी विचारपूस केली
महापौर झाल्यावर २९ एप्रिल २०१० रोजी खासदार चंद्रकांत खैरे, संजय शिरसाठ, किशनचंद तनवाणी आदींसोबत बाळासाहेबांना भेटायला गेलो. अत्यंत कठीण परिस्थितीतही औरंगाबाद शिवसेनेकडेच ठेवण्यात यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला, तर उद्धव यांच्या पत्नी रश्मी यांनी हळदी-कुंकू लावून ओवाळले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेब वाजता झोपायला निघून जायचे; परंतु आमच्यासाठी ते अर्धा तास थांबले. आमच्यासोबत चर्चा केली. सामनातील अग्रलेख रोज वाचत जा, असा सल्ला दिला. हा अनुभव आयुष्यभर साठवून ठेवावा, असाच आहे.

नामांतराचा ठराव
बाळासाहेबांचाआशीर्वाद घेऊन मी कामाला लागले. सिद्धार्थ उद्यानात हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे भूमिपूजन आणि गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्याच्या कामाने माझी कारकीर्द सुरू झाली. औरंगाबादचे संभाजीनगर आणि चिकलठाणा विमानतळाचे राजे संभाजी महाराज विमानतळ असे नामांतर करण्याचा ठराव हे सर्वात महत्त्वाचे ठरले. या काळात मी पहिल्यांदा डिफर पेमेंटने रस्ते करण्याची नवीन सुरुवात केली. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने सिल्लेखाना गुरेविरहित करण्याचा आणखी एक ठराव मी घेतला. त्यावर इथल्या नगरसेवकाने पालिकेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. लगेच सुरक्षा रक्षक आणि पाेलिस धावून आले.