आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री साबीर शेख 24 तासांत मुंबईकडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/मुंबई - सोमवारी औरंगाबादच्या मातोश्री वृद्धाश्रमात दाखल झालेले माजी कामगार मंत्री साबीर शेख 24 तासांतच मंगळवारी पहाटे मुंबईला परतले. कल्याण येथील शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना परत घेऊन गेल्याचे कल्पतरू युवा विकास मंचचे अध्यक्ष संजय तांबे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते तांबे व त्यांच्या सहका-यांनी साबीर शेख यांच्या पालन पोषणाची व उपचाराची जबाबदारी घेऊन त्यांना औरंगाबादेत आणले. मातोश्री वृद्धाश्रमात त्यांच्या निवासाची व्यवस्था करून वैद्यकीय उपचाराचीही जबाबदारी त्यांनी घेतली.

दरम्यान, शिवसेनेच्या मुंबईतील वरिष्ठ पदाधिका-यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना साबीर यांची भेट घेण्याचे आदेश दिले. मात्र खैरेंनी त्यांची भेट घेण्यापूर्वीच मंगळवारी साबीरभाई कल्याणला परत आले होते, अशी माहिती कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

बदनामी करणा-यांचा छडा लावू : लांडगे
साबीर भाई शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक आहेत. समाजाचा विरोध पत्करून त्यांनी शिवसेनेसाठी कार्य केले, त्याची आम्हाला जाणीव आहे. पक्षाने त्यांना कधीच दुर्लक्षित केलेले नाही. त्यांच्यावर आम्ही मुंबई, केरळ येथे वैद्यकीय उपचार केले आहेत. साबीरभाई स्वत:हून कल्याणला परत आले आहेत, आम्ही त्यांना आणलेले नाही. काही लोकांनी प्रसार माध्यमांत बदनामी करून साबीरभार्इंना औरंगाबादला नेले होते. यामागे त्यांचा काय उद्देश होता, कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार करण्यात आला, याचा आम्ही छडा लावू, असा इशाराही कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला.