आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी सैनिकांनाही उद्योजक बनवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - सैन्यातून अल्प वयात निवृत्त होणाऱ्या जवानांना राज्य शासनाच्या सेवेत तृतीय अथवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करावे लागते. बहुतेकांना सुरक्षा रक्षक व्हावे लागते. परंतु माजी सैनिकांची ही आेळख पुसण्याचा विडा महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाने (मेस्को) उचलला आहे. भोसरी (पुणे ) येथील महासैनिक इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सैनिकांना उद्योजक बनविण्यासाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. प्रशिक्षणानंतर त्यांना सूक्ष्म उद्योगांसाठी १२० गाळ्यांची निर्मिती केली आहे. यातील ४८ गाळे माजी सैनिकांना वितरित करण्यात आले असून, मेक इन इंडियामध्ये कार्यरत उद्योगांनी सुटे भाग या उद्योगातून घ्यावे यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. लष्करातून उर्वरित. पान ८

पस्तीशीत निवृत्त होणाऱ्या जवानांना भविष्यात अडचणींना समोरे जावे लागते. सैन्यातील निवृत्तीनंतर प्रथम मिळणाऱ्या सेवेसाठी त्यास माजी सैनिक कोट्याचे आरक्षण मिळते. निवृत्तीनंतर लगेच नोकरी मिळत नसल्याने अनेकांना अर्हता असतानाही सुरक्षारक्षकाची नोकरी करावी लागते. मेस्कोने २००२ मध्ये पाच कोटीत भोसरी येथे अडीच एकर जागा घेतली. या ठिकाणी शंभर कोटीपेक्षा जास्त खर्च करून इमारत उभारण्यात आली आहे. महासैनिक इंडस्ट्रीयल इस्टेट असे नाव देऊन येथे माजी सैनिकांसाठी विविध उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येते. इमारतीत खालच्या भागात १२० गाळे सुक्ष्म उद्योगांसाठी काढण्यात आले आहेत. पाचशे ते हजार चौरस फुटांच्या या गाळ्यांची विक्री अत्यल्प दरात मेस्कोद्वारे माजी सैनिक, त्यांची मुले, विकलांग सैनिक, युद्धात जायबंदी झालेले सैनिक आणि शहिदांच्या विधवा आदींना केली जाते.
प्रशिक्षण व इतर सुविधा
प्रतिवर्षी हजार सैनिकांना उद्योजक कौशल्य विकसनाचे प्रशिक्षण दिले जाईल. पायाभूत सुविधा आणि स्त्रोत सामायिक असल्याने प्रत्येक सुक्ष्म उद्योगाला प्रशासकीय आणि वितरणाचा खर्च ५० टक्के कमी येईल. उद्योजकांना पतसुविधा, मशिनरी, कच्चा माल सवलतीच्या दरात मिळणे, विक्री केंद्र, सेमिनार कम एक्झिबिशन, प्रशिक्षण किंवा इनक्युबेशन सेंटर, कौशल्ये विकसन केंद्र, तांत्रिक प्रशिक्षण आदी बाबी उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे शॉप्सच्या उत्पादन प्रक्रियांचा समन्वय साधून कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करण्यात येईल.
मेक इन इंडियासाठी प्रयत्न
केंद्राने मेक इंडिया उपक्रमात एल अॅण्ड टी, भारत फोर्ज, टाटा मोटार्स आणि महिंद्रा आदी उद्योगांना सैन्याची साधन सामग्री बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी केले आहे. या उद्योगांसाठी सुटे भाग पुरविण्याचे काम मेस्कोतर्फे विकसित सुक्ष्म उद्योगांना देण्यासंबंधी प्रयत्न करण्याचे आश्वासन माजी सैनिक पुनर्वसन विभागाचे महासंचालक मेजर जनरल जगतबीर सिंह यांनी दिले.

सुरक्षारक्षक ही आेळख मिटवणार
निवृत्त सैनिकांना उद्योजक म्हणून आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. विविध सुक्ष्म उद्योगांची निवड केली जाईल. अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रशिक्षण, विपणन आणि वितरण प्रणालीवर भर देण्यात येईल. भोसरी येथील महासैनिक आैद्योगिक वसाहत देशात आदर्श ठरेल असा उपक्रम आहे.
- कर्नल सुहास जतकर, संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे महाराष्ट्र
बातम्या आणखी आहेत...