आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, HSC English Paper Issue At Aurangabad, Divya Matathi

इंग्रजी सोपा, विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कॉपीमुक्तीचे वारे आणि प्रश्नपत्रिकेचे बदललेले स्वरूप यामुळे नेहमीच अवघड वाटणारा इंग्रजीचा पेपर चांगला गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे या वर्षी इंग्रजी विषयाच्या उत्तीर्णतेची टक्केवारी वाढण्याचे संकेत आहेत. पेपरपूर्वी चिंतातुर दिसणार्‍या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर परीक्षा केंद्रातून बाहेर येताना हास्य दिसून आले.

गुरुवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर सोपा गेल्यानंतर शुक्रवारच्या इंग्रजी पेपरविषयी विद्यार्थ्यांत भीती दिसून येत होती. सकाळी 10:30 वाजता चिंताग्रस्त चेहर्‍यांनी परीक्षा केंद्रात गेलेले विद्यार्थी दुपारी दोननंतर हसतमुखाने बाहेर पडले. इंग्रजीची भीती घालवण्यासाठी यंदा प्रथमच पश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्यात आले होते. सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकेल आणि गुणवंत विद्यार्थ्यांची गुणवत्ता पडताळून पाहता येईल, असे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप होते, अशी प्रतिक्रिया इंग्रजीच्या प्राध्यापकांनी व्यक्त केली.

तळमळ शिकण्याची, साथ गुरुजींची : मंठा येथील ज्ञानेश्वर काळे या कला शाखेच्या विद्यार्थ्याचे शालेय शिक्षण मंठय़ाच्या लालबहाद्दूर शास्त्री शाळेत झाले. परंतु घरात कोणीही शिकलेले नाही. वडील शेतमजूर,भाऊ आणि आईही शेतातच राबतात. त्यामुळे हालाखीची परिस्थिती. शिकलो नाही तर आयुष्यभर मजुरी करावी लागेल, हा विचारच स्वस्थ बसू देत नसल्याने ज्ञानेश्वरने शिक्षकण्याचा संकल्प केला. दिवसभर तो किराणा दुकानात काम करतो आणि रात्री भाड्याच्या खोलीत आल्यावर वेळ मिळेल तसा अभ्यास करतो. त्याला गणवेश आणि पाठय़पुस्तकांसाठी प्रा.वृंदा देशपांडे यांची मदत होते. अभ्यास समजून सांगण्यासाठी इतर प्राध्यापकही मदत करतात.

गुणवत्ता तपासणारा पेपर
या वर्षी अभ्यासक्रम बदलला. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकेचे स्वरूपही बदलले आहे. यात सर्वसामान्य विद्यार्थी किमान उत्तीर्ण होईल इतके गुण सहज मिळवू शकतो, तर गुणवंत विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता पडताळणारे बदल यात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला. इंग्रजीची भीती दूर होण्यासाठीचा हा प्रयत्न चांगला आहे. प्रा.संजय गायकवाड

बदललेले स्वरूप चांगले
मला सी सेट आला होता. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलल्याने खूप फायदा झाला. सहज सोडवता येतील, अशा प्रश्नांची उत्तरे उतारा वाचूनच आकलन करता आली. पेपर खूप सोपा गेला. मनीषा गोंदवाल, परीक्षार्थी

सरावाचा फायदा झाला
बदललेल्या अभ्यासक्रमात बर्‍याच गोष्टी नवीन होत्या; परंतु सरावामुळे पेपर सोडवण्यास मदत मिळाली. वेळेचे नियोजन चांगले करता आले. प्रसाद देशपांडे, परीक्षार्थी

असे आहेत इंग्रजीतील बदल
रॅपिड रीडिंग अवघड होते; परंतु पूर्वीसारखा निबंध नव्हता. टुरिस्ट रिफ्लेक्ट, नोट मेकिंग आणि मुलाखत या नवीन बदलांमुळे पेपर सोपा झाला आहे. तसेच माहितीवर नोकरीसाठी अर्ज करा, उतारा वाचून उत्तरे लिहा, हे पूर्वी पेपरमध्ये नव्हते.

नेहमीच अवघड वाटणार्‍या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलल्याने विद्यार्थ्यांसाठी पेपर सोपा; इंग्रजी विषयातील उत्तीर्णतेचा टक्का वाढणार