आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exam News In Marathi, Mass Copy Issue At Aurangabad Rural Areas, Divya Marathi

‘कॉपीगिरी’: प्रत्येक विषयाच्या कॉपीसाठी एक ते तीन हजारांचे कंत्राट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात कॉपी मुक्त अभियानात शिक्षण विभागाला यश मिळाले असले तरी, जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियानाचा पार फज्जा उडाल्याचे शुक्रवारी (21 फेब्रुवारी) स्पष्ट झाले. अनेक केंद्रांवर सामूहिक कॉपी धडाक्यात सुरू होती. परीक्षागृहातून आणि बाहेरूनही कॉपी पुरवली जात होती. शिक्षकच कॉपी पुरवण्याचे कंत्राट घेत असून प्रत्येक विषयासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक ते तीन हजार रुपये घेतले जात असल्याचे उघड झाले आहे.

‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची पाहणी केली असता वरील बाब उघड झाली. प्रस्तूत प्रतिनिधीने परीक्षार्थींच्या सहा पालकांशी संवाद साधला. नाव छापू नका या अटीवर त्यांनी शिक्षकच कंत्राट घेत असल्याचे सांगितले. ‘अमुक गाइडच्या तमुक पानावर अमुक प्रश्नाचे उत्तर आहे, ते पान फाडून आणा, असे शिक्षकच कॉपी पुरवणार्‍यांना सांगतात’, असे पालक सांगत होते. घृष्णेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात एका पाठोपाठ दोन पथकाने तीन मिनिटांच्या अंतराने भेट दिल्याने कोणताही अनुचित प्रकार दिसला नाही. मात्र विद्यार्थ्यांना पेपर सोडवू द्या. त्यांचे नुकसान होईल असे सांगून वर्गात जाऊन पाहू नये, अशी विनंती या प्रतिनिधीला शिक्षकांनी केली. त्यावरून येथे कॉपी करण्यात येत असल्याची चाहूल लागली.

न्यू हायस्कूल गदाना
गदाना येथील केंद्रावर शिक्षकांनीच बाहेरची कॉपी आत देण्यासाठी दुवा होण्याचे काम पार पाडले. गाडी बघताच येथील शिक्षक व कॉपी देणार्‍यांनी स्पीच आणि प्रश्न सहावा ए या प्रश्नाचे उत्तर असलेल्या 55 झेरॉक्स प्रती बाजूला कपाटात फेकून दिल्या होत्या. या प्रती प्रतिनिधीने हस्तगत केल्या आहेत. याच केंद्रावर शिक्षण मंडळ, शिक्षण विभाग आणि पोलिसांच्या पथकाने भेट दिली होती. त्यानंतरही हा प्रकार समोर आला. दीड वाजता बाजारसावंगी येथील कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली असता बाहेरून कॉपी देणारी मुले दिसून आली. तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या केंद्रावर असे आढळले प्रकार
राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची तपासणी न करताच वर्गात बसवले. खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी 11.20 वाजता शिक्षण मंडळाचे पथक आलेले होते. त्यांनी शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र वर्गाच्या बाहेरील बाजूला इंग्रजी विषयाचे निबंध, प्रश्नोत्तराचे अपेक्षित आणि प्रश्न सहावा अ, ब आणि प्रश्न सातवा अ याची रुलिंग पेपरवर उत्तरे लिहिली असल्याचे आढळून आले.