आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या परीक्षा: पालकांनो या गोष्टी टाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - परीक्षेला सामोरे जातानाचे हे शेवटचे काही क्षण आहेत. या काळात मन शांत ठेवणे जास्त सोयीस्कर असते. वर्षभर केलेल्या कामाचे मूल्यमापन होणार असल्याने खरे तर आपल्याला या दिवसांचा अभिमान वाटायला हवा. त्यातील यशापयशावर आपल्या पुढच्या संधींचा रस्ता प्रशस्त होणार असतो. मात्र आपण त्याबाबत भीती बाळगली तर याच रस्त्यावर आपली चुकण्याचीही शक्यता जास्त असते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि तेवढ्याच आनंदाने परीक्षेला सामोरे जायला हवे. 
 
परीक्षांना सामोरे जाताना निर्धास्तपणे वावरण्याची सवय चांगली. परीक्षेचा टाइमटेबल लक्षात घेऊन त्याप्रमाणे विषयांना वेळ देण्याची आखणी करा. नियोजनातून अधिक वेळ मिळतो. अभ्यासाला बसण्याची बैठक मोठी असणे महत्त्वाचे असते. अभ्यास करण्यापूर्वी एक-दोन एकाग्रतेच्या ‘टेकनिक्स’ वापरल्या तर फायद्याचे ठरते. एकाग्रता साधण्यापूर्वी मनाला शरीराला शिथिल करण्याची कलाही काही जणांमध्ये असते. पाठ केलेले, आत्मसात केलेले लक्षात ठेवणे महत्त्वपूर्ण अाहे. परीक्षेला जाण्यापूर्वीच्या या शेवटच्या टप्प्यात महत्त्वाच्या टिप्स काढणे फायदेशीर ठरते. सराव प्रश्नांचा अभ्यास या शेवटच्या टप्प्यात महत्त्वाचा असतो. जे प्रश्न सहज येतात त्यांना कमीत कमी वेळेत कसे सोडवता येतील, याची एखादी क्लुप्तीही विद्यार्थ्यांनी अमलात आणावी. 
 
प्रश्नपत्रिका हाती आल्यावर अगोदर दीर्घ श्वसन घ्या... 
- दहावी किंवा बारावीचा अभ्यास एका रात्रीतून होत नसतो. सेल्फस्टडी केव्हाही चांगली. बारावीच्या विद्यार्थ्यांनी मार्कांचे जास्त टेन्शन घेऊ नये. कारण पुढे कोणत्याही शाखेसाठी ‘सीईटी’ किंवा ‘नीट’ द्यावीच लागते. सरासरीचा टक्का वाढण्यासाठी परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे, मात्र अतिरेक टाळावा. संभाव्य प्रश्नांची तयारी खरे तर ११ वीच्या वर्गापासूनच असायला हवी. मन:शांती, तंदुरुस्ती, योग्य आहार महत्त्वाचा आहे, हे विसरू नये. -डॉ.हरी मोरे, मा.विस्तार संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 

-विद्यार्थ्यांनी सगळ्यात आधी परीक्षेची भीती दूर करावी. वस्तुस्थितीपेक्षा जास्त टेन्शन घेण्याच्या सवयीमुळे आपण अनेकदा परीक्षेची अनामिक भीती बाळगत असतो. त्याऐवजी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेल्यास अनेकदा चांगले यश मिळते. प्रत्येक विषयाचा अभ्यास हा वर्षभरात करायचा असतो. परीक्षेच्या काळात मात्र कमीत कमी सात-आठ तास झोप, चांगला आहार हे महत्त्वाचे असते. -हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ
 
- परीक्षेच्या काळातकाही विद्यार्थ्यांना घाम येणे, हातापायांना कंप सुटणे किंवा अगदी ब्लँक होणे असा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी १० वेळा दीर्घ श्वसन करण्याचा उपाय एकदम चांगला. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर प्रश्नपत्रिका हातात घेण्यापूर्वी दहा वेळा दीर्घ श्वसन केल्यास शरीर मन स्थिर होते. मग प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचण्यास सुरुवात करावी. जी सोपी वाटतील ती आधी सोडवावीत, मात्र त्यात अतिरिक्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्यावी. मग इतर प्रश्नांसाठीही हातात वेळ शिल्लक राहील. -डॉ.संजय मालपाणी, शिक्षणतज्ज्ञ, संगमनेर 
 
अाम्हीही तुमच्याबरोबर... :
विद्यार्थीकिंवा पालकांना परीक्षेबाबत काही अडचणी असतील तर अाम्हीही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत dbstar@dbcorp.in या मेलवर किंवा ७७२००३७००७ या मोबाइलवर फक्त ‘एसएमएस’द्वारे पोहोचवा. योग्य प्रश्नांना प्रसिद्धी दिली जाईल. डॉ. संजय मालपाणी, डॉ. हरी मोरे हे या प्रश्नांची उत्तरे देतील. प्रश्न फक्त ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयाचेच असले पाहिजेत. 
 
विद्यार्थी पालकांसाठी उपयुक्त माहितीचा शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय मालपाणी यांचा विद्यार्थी पालकांसाठीचा मार्गदर्शनपर व्हिडिआे पाहण्यासाठी www.divyamarathi.com ला भेट द्या.
 
 
हे लक्षात ठेवावे... 
-परीक्षा होईपर्यंत सकस आहार घ्या. 
 
-पुरेशी झोप घ्या. कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्या. 
 
-ध्यानधारणेसाठी पाच-दहा मिनिटे रोज काढून ठेवा. 
 
-अभ्यासाचे टाइमटेबल बनवा. जेवण, झोप अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या. 
 
-लिहिणे आणि बसणे याचा सराव या काळात ठेवायलाच हवा.
 
-योग्य वेळी टीव्ही, मोबाइलचा वापर करावा, मात्र त्याचा अतिरेक करू नये. 
 
-झोपताना मोबाइलचा वापर, चॅटिंग असे प्रकार टाळावेत. 
 
-अभ्यास करताना फोन जवळ ठेवणे टाळावे. मेसेज टोन किंवा फोनच्या रिंगमुळे लक्ष केंद्रित होत नाही.

- शक्यतो या काळात मोबाइल फोन बंद ठेवणेच जास्त चांगले. 
 
-परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात हेल्पबुक किंवा वर्षभरात काढलेल्या टाचणांचाच अभ्यास केलेला चांगला असतो. 
 
-बाजारात मिळणाऱ्या रिव्हिजन बुकची मदतही अनेकदा फायदेशीर ठरते. 
 
-परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात मॉडेल टेस्ट पेपर तीन तासांची वेळ लावून सोडवण्याचा सराव करायला हवा. 
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...