आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Examination Controller Dr Captain Suresh Gaikwad

विद्यापीठात कॅप्टनचा ‘पतंग’ कुलगुरूंनी कापला, डॉ. शिरसाट नवे कुलसचिव, डॉ. सरवदे परीक्षा नियंत्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांचा उत्तुंग उडणारा पतंग गुरुवारी स्वत: कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीच कापला. संक्रांतीच्या दिवशीच त्यांच्यावर संक्रांत कोसळली असून कॅप्टनकडील दोन्ही पदभार तडकाफडकी काढून घेण्यात आले. कुलसचिवपदाचा कार्यभार पदार्थविज्ञानचे विभागप्रमुख डॉ. महेंद्र शिरसाट यांच्याकडे सोपवला, तर परीक्षा नियंत्रक म्हणून व्यवस्थापनशास्त्राचे संचालक डॉ. वाल्मीक सरवदे यांना नियुक्त केले. विद्यापीठातील या ‘पतंगबाजी’मुळे कॅप्टनचा पतंग पुन्हा रसायनशास्त्र विभागात स्थिरस्थावर झाला.
४ जून रोजी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या डॉ. चोपडे यांनी नामविस्तार दिनानंतर प्रशासनाला धक्का देत मोठे फेरबदल केले आहेत. त्यांनी ८ ऑगस्टला कॅप्टनकडे परीक्षा नियंत्रक म्हणून जबाबदारी दिली होती. सहा महिन्यांनी म्हणजेच ६ जानेवारीला तत्कालीन कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांची उच्च शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे या पदाचा कार्यभारही कॅप्टनकडेच सोपवण्यात आला होता.
कॅप्टनला दिलेल्या झुकत्या
मापामुळे विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, कुलगुरूंची मिळवलेली ही मर्जीच कॅप्टनसाठी गुरुवारी खप्पामर्जी ठरली. संघटनांच्या अंतर्गत कलहांच्या पतंगबाजीमुळे ‘कॅप्टन’चा पतंग पूर्ववत जाऊन पडल्याचे बोलले जाते. आज सकाळी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंकडे कॅप्टन विषयी तक्रारी केल्या अन् दुपारी दीड वाजता कॅप्टनकडचा पदभार डॉ. शिरसाटांकडे सोपवला. यासंदर्भात कुलगुरूंची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मला माहिती नाही
कुलगुरूंनी पदभार सोडण्यास सांगितल्यामुळे मी लगेच दोन्ही पदभार सोडले आहेत. अर्थात, नेमके काय ‘राजकारण’ झाले याविषयी मी अनभिज्ञ आहे. अधिकारी निवडणे हा सर्वस्वी कुलगुरूंचा अधिकार आहे. डॉ. सुरेश गायकवाड, माजी कुलसचिव
पारदर्शकता आणणार
परीक्षा विभागात नेहमी साशंकतेचे वातावरण असते. मात्र, आपण पारदर्शकता आणून परीक्षा विभागाचे प्रशासन गतिमान करणार आहोत. परीक्षा विभागाची प्रतिमा उंचावून दाखवू. डॉ. वाल्मीक सरवदे, परीक्षा नियंत्रक