आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहोद्योगांच्या प्रदर्शनात २५ महिलांना व्यासपीठ, तेजस्विनी वतीने आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद,- तेजस्विनी ग्रुपच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम केले जाते. स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त तेजस्विनीच्या वतीने दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुरक्षित दांडियासह लक्षणीय ठरले ते म्हणजे गृहोद्योगांचे प्रदर्शन. जवळपास २५ महिला उद्योजकांना या ठिकाणी व्यासपीठ देण्यात आले होते.

झांबड इस्टेट येथील मीनाताई ठाकरे सभागृहात रंगलेल्या या दांडियासाठी महिनाभरापासून मंडळाने तयारी केली होती. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घेता यावा म्हणून खास मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते. १५ आणि १६ ऑक्टोबरला दांडिया उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये ५०० हून अधिक महिलांनी गरबा, दांडियाचा आनंद लुटला. यासोबतच येथे लावण्यात आलेल्या २५ स्टॉल्सवर कपडे, बेडशीट, दिवाळीचे खाद्यान्न, मसाले, दिवे, मेणबत्त्या आणि आकर्षक कंदील खरेदीचाही आनंद घेतला.

अतिशय रास्त दरामध्ये येथे उपलब्ध असलेल्या वस्तूंतून महिला उद्योजकांना आर्थिक हातभार लागला. याशिवाय तरुणी आणि गृहिणींना मनसोक्त दांडिया उत्सवाचा आनंद घेता आला. सहभागींपैकी अनेकींनी पहिल्यांदाच गरबा खेळण्याची हौस भागवली. ज्या तरुणींना सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे दांडिया खेळण्याची संधी मिळत नाही त्यांनाही या ठिकाणी संधी मिळाली. दोन दिवसांचा हा प्रयोग यशस्वी ठरल्याने महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. या उत्सवाच्या यशस्वितेसाठी प्राजक्ता गिरधारी, ज्योती शिराळकर, सुनीता पेंडभाजे, वनिता टाकळकर, राजलक्ष्मी भाजीभाकरे, प्राची रत्नपारखी आणि प्रगती देशपांडे यांनी सहकार्य केले.
तेजस्विनी ग्रुपतर्फे झांबड इस्टेट येथील मीनाताई ठाकरे सभागृहात भरलेल्या गृहप्रदर्शनात खरेदी करताना महिला.

पुढील वर्षी आणखी एक पाऊल पुढे राहू
यंदाआम्ही दोन दिवसांचे आयोजन केले होते. पहिल्यांदाच हा प्रयत्न असल्याने यशस्वितेबद्दल आम्ही साशंक होतो. पण आताचा प्रतिसाद पाहता पुढच्या वर्षी सगळे दिवस उत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. वैशालीलांबे, तेजस्विनी ग्रुप