आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"जलयुक्त शिवार'ची कामे पूर्ण करण्याचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्ह्यातील २२८ गावे मागील वर्षी निवडण्यात आली होती. या गावात ५१५१ कामांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी अजूनही १३१७ कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार योजनेतील राज्यातील सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रगतिपथावरील ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. मागील वर्षी जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी कामे झाली. परंतु या योजनेंतर्गत झालेली काही अतिवृष्टीत कामे वाहून गेल्याचे प्रकारही उघडकीस आले होते. या योजनेसाठी निवडलेल्या सर्व गावातली कामे आगामी तीन महिन्यांत प्रशासनाला पूर्ण करावी लागणार आहेत.
५५ कोटींचा खर्च
जिल्ह्यात कंपार्टमेंट बडिंग, मातीनाला बांध, शेततळे, साखळी सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण यासारखी कामे करण्यात आली. या कामांवर आतापर्यंत ५५ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले. जिल्ह्यातील ५१५१ पैकी ३८३४ कामे पूर्ण झाली असून १३१७ प्रगतिपथावर आहेत. सर्वाधिक कामे औरंगाबाद तालुक्यात (६७५ पैकी ५८३) झाली आहेत. जिल्ह्यातील २७१ पैकी २२० साखळी सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून ५१ बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर आहे. साखळी सिमेंट बंधाऱ्यावर आतापर्यंत २६ कोटी ९५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नवीन गावातही होणार कामे
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील २२३ गावे निवडण्यात आली आहेत. तालुकानिहाय गावांची संख्याही ठरवण्यात आली त्यानुसार गावे निवडण्यात येत आहेत. गावनिहाय सर्वेक्षण केल्यानंतर कामांना सुरुवात करण्यात येणार अाहे, असे उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांनी सांगितले.

कामे पूर्ण करणार
^जलयुक्त शिवारयोजने अंतर्गत साडेतीन हजारपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही गतीने सुरू आहेत. तीही मार्चपूर्वी पूर्ण करण्यात येतील. तसेच नव्याने निवडलेल्या गावांतही लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. संगीता सानप, उपजिल्हाधिकारी,रोहयो