आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Experience To Run School Condition Cancelled By Aurangabad Court Bench

शाळा चालविण्याच्या अनुभवाची अट औरंगाबाद खंडपीठाने केले रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विनाअनुदानित तत्त्वावर मराठी खासगी शाळांना परवानगीसाठी पाचपेक्षा जास्त शाळा चालविण्याच्या अनुभवाची अट असलेल्या शासन अधिसूचनेतील परिशिष्ट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी रद्दबातल ठरविले आहे. राज्य शासनाने 5 डिसेंबर 2012 रोजी अधिसूचना जारी करून ग्रामीण भागातील मराठी खासगी विनाअनुदानित शाळांची परवानगी देण्यासंबंधीची नियमावली जाहीर केली होती. शाळेला परवानगी देताना भौतिक सुविधांनुसार गुणदान पद्धत घोषित केली होती.

नवीन विनाअनुदानित शाळेसाठी अर्ज करणा-या संस्थेकडे पाचपेक्षा अधिक मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक शाळा चालविण्याचा अनुभव असावा अशी अट त्यात होती. ही अट पूर्ण करणा-या संस्थेस 10 गुण देण्याची तरतूद अधिसूचनेत होती. त्याला भगवानबाबा सेवाभावी संस्था व इतर नऊ संस्थांनी खंडपीठात आव्हान दिले होते. नवीन संस्थेकडे शाळा नसल्याने प्रस्थापितांचीच मक्तेदारी कायम राहून नवीन संस्थाचालकांना संधीच मिळणार नाही. उपरोक्त बाब घटनेच्या कलम 14 चे उल्लंघन करणारी असल्याचा युक्तिवाद संस्थांनी खंडपीठात केला. यामुळे नवीन कुणालाच संधी मिळणार नाही. खंडपीठाने अन्यायकारक परिशिष्ट रद्द ठरविल्याने यासाठी ठेवण्यात आलेले 10 गुणही रद्द झाले आहेत