आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीत राहायचेय, तर छोटे-छोटे बदल स्वीकारावे लागतील, दिग्गजांचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्ट सिटीचा खरा विकास स्मार्ट लोकच करू शकतात. त्यासाठी या शहरातील लोकांना स्मार्ट व्हावे लागेल. सर्व विकास हा केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून नव्हे, तर लोकांनी स्वत:मध्ये केलेले छोटे-छोटे बदलच मोठा विकास घडवून आणतील, असे मत देशभरातून आलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. कॅन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) च्या वतीने हॉटेल रामामध्ये स्मार्ट सिटीज अनफोल्ड इन महाराष्ट्र या विषयावर विशेष चर्चासत्र झाले. यासाठी सीआयआयचे राज्याध्यक्ष अरूप बसू, पुणे येथील लवासा कॉर्पोशनचे माजी अध्यक्ष एस. नारायणन, स्टरलाइट टेक्नॉलॉजीचे मुख्य तंत्रविकास अधिकारी डॉ. बद्री गोमातम, टाटा ग्लोबल डिलिव्हरी विभागाचे अध्यक्ष आदित्यराय चौधरी, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची उपस्थिती होती. दिवसभरात रस्ते, वीज पाणी, गव्हर्नन्स, प्रदूषणविरहित वातावरण, सर्वच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विषयावर पाच चर्चासत्रे झाली. छोटे-छोटे बदल शहरवासीयांना स्वीकारावे लागतील, आधी स्मार्ट व्हावे लागेल, तरच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट होईल, असा मंत्रच तज्ज्ञांनी दिला.

सवयी बदलल्या तरच तंत्रज्ञान टिकेल...
पाणी, वीज बचत, कचरामुक्तीचे शहर हे जो जपेल तोच स्मार्ट माणूस. तंत्रज्ञानाने शहरांचे बाह्य स्वरूप बदलेल, पण आपल्या सवयीच ते तंत्रज्ञान टिकवू शकेल, असा मंत्र डॉ. बद्री गोमातम यांनी दिला.
शहरवासीयांचे सहकार्य हवे..
डीएमआयसीच्यास्मार्ट सिटीला जुने शहर जोडताना केंद्राच्या शंभर शहरांच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबादही जोडण्याचा महापालिका प्रयत्न करत आहे. यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या सूचना मागवल्याशिवाय हे काम केले जाणार नाही. जनतेचे सहकार्य प्रत्येक बाबतीत लागणार आहे, असे मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी समारोपाआधीच्या सत्रात सांगितले.
स्मार्ट सिटीतच ग्रीन सिटी व्हावी
स्मार्टसिटी म्हणचे भरपूर पाणी, भरपूर वीज, भरपूर कनेक्टिव्हिटी म्हणजेच सर्व काही सहज, सुंदर अन् सोपे म्हणजे सुखी माणसाचा सदरा सर्वांनी घातलेले शहर. स्मार्ट सिटीतील सर्वच वसाहती या ग्रीन सिटी व्हाव्यात. यात वीज, पाणी आणि ऊर्जेचे रिसायकलिंग आणि बचत व्हावी हाच उद्देश आहे. त्यासाठी लोकांनी ऊर्जा बचतीच्या सवयी लावून घ्यायला हव्यात, असे मत अरूप बसू यांनी व्यक्त केले.
स्मार्ट फोरम स्थापन करणार
शहरातील नागरिक, उद्योजक विद्यार्थी यांचा एक फोरम तयार करून त्याद्वारे चांगले बदल शहरात करता येतील. सेल्फ गव्हर्नन्स किंवा सेल्फ अकाउंटिबिलिटी महत्त्वाची आहे. प्रत्येकाला वॉर्ड स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, ऊर्जा बचत, रेनवॉटर हार्वेस्टिंग शिकून घ्यावे लागेल, असे सीआयआय औरंगाबाद शाखाध्यक्ष एन.श्रीराम म्हणाले .
डिजिटल खेडीच खरा विकास करणार..
स्मार्ट शहर योजनेत खेडीही शहरांना जोडली जाणार आहेत. खेड्यांना शहरात सामावून घेताना मोठा बदल होणार आहे. त्याची गुंफण आपल्यालाच करावी लागेल. पायाभूत सुविधांचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनीही घेतले, तरच खेडीही डिजिटल होतील, असा विश्वास आदित्यराय चौधरी यांनी व्यक्त केला.
शेतकरी आधी बळकट करा...
विभागीय आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले, शेतकरी मुलांना शिकवण्यास शहरात येतोय. पण त्याला घरभाडे किंवा विकतचे घर घेणे आवाक्याबाहेर जाते. त्याला या विकासाच्या नाळेसोबत जोडल्याशिवाय स्मार्ट सिटीला खरी स्मार्ट सिटी म्हणता येणार नाही. शेती स्वेच्छेने होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. शेतकऱ्यांना विकासात सामावून घ्या, अशी कळकळीची विनंती दांगट यांनी केली.

लवासाप्रमाणे ऑडिट करा
एस.नारायणन म्हणाले की, आम्ही लवासा सिटीचा आराखडा तयार केला, तेव्हा ग्रामस्थांच्या बैठका घेऊन त्यांची मानसिकता बदलली. ग्रुप मीटिंग अजूनही दरमाह होते. तेथे रस्ते, वीज, पाणी यासह अनेक पायाभूत सुविधा देताना खूप मेहनत घ्यावी लागली. लवासा स्मार्ट सिटी होईल, असे वाटले नव्हते, पण ती पूर्ण होताच कौतुकाचा विषय ठरली.
बातम्या आणखी आहेत...