आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exploitation Of Electricity Customers; Court Appellant MLA Prshant Bamb

वीज ग्राहकांचे शोषण; कोर्टात दाद मागणार -आमदार प्रशांत बंब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-वीज दरवाढीच्या नावाखाली ग्राहकांच्या होत असलेल्या शोषणाच्या विरोधात दाद मागण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वीज ग्राहक, या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आमदार प्रशांत बंब यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी केली आहे.

शहरात अडीच लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहक आहेत. त्यांना वीज वापर रकमेपेक्षा जो विविध पाच प्रकारचा अधिभार दर लावण्यात येत आहे त्याची रक्कम जास्त आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. अधिभार दरात काही प्रमाणात कपात केली आणि राज्य सरकारने अधिभारांचा बोजा स्वत: उचलला तर दिल्लीच्या धर्तीवर औरंगाबादेतही वीज दरामध्ये किमान 50 टक्के कपात होऊ शकते, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

वीज बिले जास्त येत असल्याच्या तक्रारीत प्रचंड वाढ झाली आहे. पण वीज बिले का वाढली याचे उत्तर जीटीएल व्यवस्थापन ग्राहकांना नीट देत नाही. दिले तरी बिलावर सर्व माहिती दिली आहे. आपण ती बघून घ्यावी, असे ग्राहकांना सांगितले जाते. या उत्तरामुळे ग्राहकही खोलवर जाऊन माहिती न घेता निमूटपणे वीज बिलाचा भरणा करतात.

जेवढा युनिट वापर तेवढा अधिभारांचा बोजा : महाजनको वीज निर्मिती कंपनी महावितरणला 3 रुपये 6 पैसे प्रतियुनिटप्रमाणे वीज विक्री करते. महावितरणला ग्राहकापर्यंत एक युनिट वीज पोहोचवण्यासाठी सरासरी 5 रुपये 56 पैसे खर्च येतो. पण महावितरण कंपनी बीपीएल वीज ग्राहकांसाठी 76 पैसे प्रतियुनिट, घरगुतीसाठी 0 ते 100 युनिटसाठी 3.36 पैसे, 101 ते 300 युनिटसाठी 6 रुपये 5 पैसे, 301 ते 500 युनिटसाठी 7 रुपये 92 पैसे, 501 ते 1 हजार युनिटसाठी 8.78 पैसे, तर एक हजार युनिटपेक्षा अधिक वीज वापरणार्‍या ग्राहकांना 9 रुपये 50 पैसे प्रतियुनिट बिल आकारते.

2037.78 कोटी रुपयांची भरपाई राज्यातील वीज ग्राहकांडून वसूल : महाजनकोच्या खापरखेडा येथील संच क्रमांक 5, भुसावळ येथील संच क्रमांक 4 यांच्या उभारणीचा खर्च 932.01 कोटी, महाजनकोचा 2010-11 मधील मंजुरीतील फरक 143.12 कोटी तसेच महापारेषण वीज कंपनीचा वीज वहन दर 962.65 कोटी असे एकूण 2037.78 कोटी महावितरण वीज कंपनीस देणे आहे. ही रक्कम राज्यातील महावितरणच्या सर्व वीज ग्राहकांकडून सप्टेंबर 2013 पासून पुढील सहा महिन्यांत वसूल करण्याचे काम सुरू आहे. या प्रचंड दरवाढीमुळे उद्योजक, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडेच मोडल्याचे वीज आयोगाचे ग्राहक प्रतिनिधी हेमंत कापडिया यांनी सांगितले.


इंधन समायोजन आकार + अतिरिक्त आकार + वीज शुल्क + वीज विक्री कर हे सर्व कर युनिट वापराप्रमाणे + वेळेत वीज बिलाचा भरणा केला नाही म्हणून व्याज अशा प्रकारे एकूण वीज बिल आकारण्यात येते.

स्थिर आकार
युनिट वापराप्रमाणे घरगुती ग्राहकांसाठी 0 ते 100 युनिटसाठी 40 रुपये, 101 ते 300 युनिट वापरापर्यंत 130 रुपये

स्थिर आकार बंधनकारक

वीज वापरा अथवा वापरू नका, स्थिर आकार दराची रक्कम ग्राहकांना भरावीच लागते. बीपीएलसाठी प्रतिमहा 10, घरगुती ग्राहकांसाठी 0 ते 100 युनिटसाठी 40, 101 ते 300 युनिटसाठी 130, 301 ते 500 युनिटसाठी प्रतिकिलोवॅट 100 रुपये, वाणिज्य ग्राहकांसाठी 190 रुपये, औद्योगिक ग्राहकांसाठी 50 ते 90 रुपये, कृषी ग्राहकांसाठी 295 प्रमाणे वीज बिलात आकारणी केली जाते. यामुळे वीज वापरापेक्षा अधिभारामुळे बिल फुगते.

ग्राहकांना आकारले जातात पाच प्रकारचे अधिभार

न्यायालयात जाणार
अधिभाराची माहिती दिली जात नाही. ग्रामीण भागात वीज मिळत नाही. याला कारणीभूत महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आहेत. ग्राहकांच्या शोषणाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार. प्रशांत बंब, आमदार.

विजेचे लेखापरीक्षण व्हावे

वीज वितरण कंपन्या काल्पनिक तोटा दाखवून अधिक दर आकारतात. यामध्ये वीज ग्राहकांची लूट होत आहे. तेव्हा दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रतही वीज कंपन्यांचे लेखापरीक्षण करावे. यामुळे ग्राहकांनाही वीज स्वस्तात उपलब्ध होईल. ग्राहकांची होणारी आर्थिक लूट थांबेल. बाळासाहेब सराटे, सदस्य, आम आदमी पार्टी.

हा अधिकार आयोगाला

वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणेच अधिभार, स्थिर आकार आदी दरांचा वीज बिलात समावेश करून ग्राहकांना वीज बिले वितरित करण्यात येतात. यामध्ये कमी जास्त करण्याचा अधिकार आयोगालाच आहे. त्यासंदर्भात मी बोलणे उचित नाही. आदिनाथ सोनवणे, अधीक्षक अभियंता, महावितरण.