आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांनी हाताळल्या एके-४७, पिस्टल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लहानवयात खेळण्यातील बंदूक हाताळणाऱ्या चिमुकल्यांनी गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी एसआरपीएफ जवानांच्या बंदुकी हाताळल्या. विभागामध्ये उपलब्ध असलेल्या शस्त्रसाठ्यातील लाइट मशीनगन, सेल्फ लोडिंग रायफल, एके-४७, इसास रायफल, पिस्टल आदी शस्त्र मुलांसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने प्रत्येक शस्त्राची माहिती घेतली.
साताऱ्यातील राज्य राखीव पोलिस बल गटातर्फे २६/११ दिनानिमित्त परिसरातील डॉ. हेडगेवार मेमोरियल पब्लिक स्कूल, समर्थ विद्यामंदिरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मैत्री अभियानाद्वारे शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी २६/११ च्या हल्ल्यातील शहीद पोलिस अधीक्षक निसार तांबोळी, श्यामसुंदर कणके यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेतर्फे जवळपास १०० मुलांनी बारूद, शस्त्र हाताळत माहिती घेतली. शस्त्रांची निर्मिती, त्यांचा वापर, कार्यपध्दती, आकार वजनासह विविध प्रश्नांचा भडीमार मुलांनी जवानांवर केला. मुलांना मार्गदर्शन करताना तांबोळी म्हणाले की, आपला अन्नदाता सध्या कुठल्या परिस्थितीतून जात आहे, याची जाणीव करून घेण्यासाठी आत्महत्याग्रस्त, दुष्काळी भागातील मुलांना कॅम्पमध्ये बोलावण्यात आले. दुष्काळग्रस्त भागातील वय शिक्षणाची अट पूर्ण केलेल्या पोलिस, सैनिक दलात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी १५ ते २० दिवसांचे मोफत भरती प्रशिक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. एसआरपीएफतर्फे राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असून येथील स्वच्छता शिस्त मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे कणके म्हणाले. भविष्यात अशाच प्रकारचे हजार विद्यार्थ्यांसाठी ७० एकर जागेमध्ये वसाहत, शाळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त करत समाजातील प्रत्येकानेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला सहायक पोलिस आयुक्त ए. के. शेळके, पोलिस निरीक्षक अशोक साळवे, मुबारक पजरेशा, उपनिरीक्षक अशोक बेलुरे, एस. पी. जाधव, किशन येरमुरे, कृष्णा हिसवनकर, सुनील जगताप, समाधान काळे यांची उपस्थिती होती.

कार्यपद्धती समजावून घेतली
अनेक विद्यार्थ्यांनी शस्त्र हातात घेण्याची इच्छा व्यक्त केली. प्रदर्शनामध्ये लाइट मशीनगन, सेल्फ लोडिंग रायफल, एके-४७, इसास रायफल, पिस्टल, टिअर स्मोक ग्रिनेड आदी ठेवण्यात आले होते. आंदोलनावर कशा प्रकारे ताबा मिळवला जातो तसेच एसआरपीएफच्या जवानांची कार्यपद्धती मुलांना समजावून सांगण्यात आली. या वेळी आयोजित रक्तदान शिबिरात १०७ जवानांनी रक्तदान केले. लोकमान्य ब्लड बँकेने रक्तसंकलनाचे काम केले. डॉ. वैशाली डकले, शिवराज पटवारी, मुकेश शेख यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.