आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • F. M. Shinde Talk On Sahitya Sammelan In Aurangabad

अध्यक्षपद सत्तेचे नसून सन्मानाचे : फ. मुं. शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सत्तेचे नसून सन्मानाचे आहे, असे मत प्रख्यात कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांनी व्यक्त केले. ते जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात बोलत होते. व्यासपीठावर प्रख्यात साहित्यिक व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे, विश्वास वसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपण ही अध्यक्षपदाची निवडणूक मानत नाही. हे सत्तेचे पद नाही तर सन्मानाचे आहे. व्यक्ती किती लोकप्रिय आहे यापेक्षा किती सर्वप्रिय आहे हे महत्त्वाचे आहे. प्रेम कविता लिहिताना कमिंटमेंट असावी लागते. आतापर्यंत आपले 27 कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, ते सर्व विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमासाठी त्यांचा समावेश केलेला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रचलित पद्धत असून, त्याच्यावरच चर्चा व्हावी, सध्यातरी अध्यक्ष निवडीसाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पुणे साहित्य परिषदेकडून अर्ज भरताना सूचक म्हणून रामदास फुटाणे होते, तर मसापकडून अर्ज सादर करताना मराठी विश्व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे सूचक आहेत.

नव्या पिढीमध्ये अनेक नवलेखक लिखाण करत आहेत.या नवलेखकांच्या पिढीमध्ये आकलन आणि चिंतन छान आहे. तसेच भारतीय साहित्यामध्ये इतर भाषेच्या साहित्याच्या तुलनेत मराठी साहित्यही मागे नाही. मराठीसाठी जीवित कार्य मानले आहे आणि ते पुढे चालूच राहील. संमेलनामध्ये होणार्‍या वादाबद्दल विचारले असता त्या ठिकाणची असणारी परिस्थिती आणि आयोजकांवर ते अवंलबून असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. पानतावणे म्हणाले, साहित्यामध्ये शिंदे यांच्या स्थानाबद्दल चर्चा करण्याची गरज नाही. मराठवाड्यात थोर समीक्षकांची परंपरा आहे. मात्र समीक्षकांची यादी फक्त महानोरांपर्यंतच जाते. शिंदेंच्या साहित्याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करणारे साहित्यिक आहेत. आईसारखी दुसरी कविता नाही. खर्‍या अर्थाने शिंदे निवडणुकीत उभे राहिल्यानंतर सर्वांनीच माघार घ्यायला हवी होती. प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, रमेश राऊत, राजेभाऊ मोगल यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. संजय वरकड यांनी प्रास्ताविक तर माधव सावरगावे यांनी सूत्रसंचालन केले.