आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रियांनी पळाले व्यंग, 95 चेहर्‍यांवर फुलले हास्य!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लायन्स क्लबच्या वतीने आयोजित प्लास्टिक सर्जरी शिबिरात पहिल्याच दिवशी 95 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये दुभंगलेले ओठ जुळले, चेहर्‍यावरील व्रण नष्ट झाले. विद्रूप नाक सुंदर करण्यात आले. उघडझाप न होणार्‍या पापण्या कार्यरत झाल्याने रुग्ण व कुटुंबीयांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले.
पद्मर्शी स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित यांनी औरंगाबादेत गत 35 वर्षांपासून चालू ठेवलेला प्लास्टिक सर्जरीचा वसा त्यांच्या पश्चात तेवत ठेवण्याचे काम अमेरिकेचे प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला, डॉ. विजय मोराडिया, डॉ. संजय लाला, डॉ. स्वाती मोराडिया, डॉ. ललिता लाला, नर्स नेहा मोराडिया करत आहेत. शिबिराचे यंदा 38 वे वर्ष आहे. 37 वर्षांत 12 हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यंदा 357 प्लास्टिक सर्जरी व 31 तिरळेपणावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. केवळ औरंगाबादच नव्हे, तर मराठवाडा, विदर्भ, खान्देशातून रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती एम. के. अग्रवाल यांनी दिली. शस्त्रक्रियेनंतर दोन ते पाच तासांनी रुग्णांना घरी जाण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळतो. पाचदिवसीय शिबिर असले, तरी 20 डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच कोपरगाव, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणी शिबिर घेण्यात येणार आहे. याचा फायदा संबंधित रुग्णांना होणार आहे.
शस्त्रक्रियांनी पळाले व्यंग, 95 चेहर्‍यांवर फुलले हास्य!

मनस्वी आनंद
लहानपणापासून ओठ दुभंगलेले होते. नाक विद्रूप असल्याने मला वाईट वाटत होते. मित्र-मैत्रिणी चिडवत असत. त्यामुळे आमची भांडणेही होत, पण शस्त्रक्रियेनंतर दुभंगलेले ओठ जुळले आहेत. याचा मला मनस्वी आनंद होतो.
-ज्योती पवार, जालना

श्वास घेता येत नव्हता
माझी पंधरा महिन्यांची मुलगी आहे. तिला जन्मजात नाकाचे व्यंग होते. त्यामुळे श्वासोच्छवास घेण्यास अडचण येत होती. तिचे आरोग्य खालावत चालले होते. मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याने डॉक्टरांचे धन्यवाद मानते.
-समिनाबेगम, हसरूल.