आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी नजीकच्या बँकेत सात हजार रुपये जमा करा, असे सांगत एका महिलेला गंडा घालण्याचा प्रयत्न त्या महिलेच्या सतर्कतेमुळे फसला.
फुलंब्री येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षिकेची नोकरी करणार्या सुरेखा गणेश पांडव (रा. हडको, एन-11) यांना रविवारी सायंकाळी पाकिस्तानातून 3046711113 क्रमांकावरून कॉल आला. सिलिंडर बुकिंगसाठी ओंकार गॅस एजन्सीमध्ये पाठपुरावा करत असल्याने एजन्सीतूनच फोन आला आहे, असे त्यांना वाटले. मात्र, समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लॉटरी लागल्याचे सांगितले. तेव्हा हा काहीतरी गमतीचा प्रकार असावा, असे वाटून त्यांनी कॉल कट केला.
अभिनंदन आणि सात हजार रुपये : सोमवारी सकाळी पाकिस्तानमधूनच 907116259781 क्रमांकावरून पुन्हा कॉल आला. त्या वेळी समोरच्या पुरुषासोबत एका महिलेचाही आवाज येत होता. ती महिला त्याला प्रॉम्प्टिंग करत होती. आमच्या एजन्सीकडून तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे म्हणत त्याने पांडव यांचे अभिनंदन केले. ही रक्कम तत्काळ बँकेतून तुमच्या हातात पडेल. मात्र, त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या बँकेत सात हजार रुपये जमा करावे लागतील, असे सांगितले. मला कोणत्या निकषांवर लॉटरी लागली आहे, अशी वारंवार विचारणा करूनही त्याचे उत्तर पांडव यांना मिळाले नाही. तेव्हा त्यांनी पुन्हा कॉल कट केला. ही एक गंडा घालणारी टोळी असावी, असे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी ‘दिव्य मराठी’ने सोमवारी अशाच प्रकारच्या बनावट लॉटरी प्रकरणाची प्रसिद्ध केलेली बातमी नजरेस पडल्याने त्या अधिकच सावध झाल्या.
समशेर खान नावावर अकाउंट
त्यानंतर अध्र्या तासाने पांडव यांना पुन्हा 254300345591, 3465532550 क्रमांकांवरून लागोपाठ कॉल आले. 25 लाखांची लॉटरी नाकारू नका. एवढी मोठी रक्कम तुम्हाला अत्यंत सहज मिळणार आहे. त्यासाठी आयकरापोटीचे सात हजार रुपये समशेर खान (खाते क्रमांक 33087227541) यांच्या नावावर जमा करा, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. नजीकच्या बँकेत पोहोचल्यावर तुम्हाला 2222000 क्रमांकाचे टोकन मिळेल, असेही त्याने सांगितले. मात्र, हा शुद्ध बनवाबनवीचा प्रकार असल्याचे तोपर्यंत पांडव यांना स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांनी तुमची लॉटरी नको, असे सांगत मोबाइल बंद करून टाकला.
विनाकष्टाच्या पैशाच्या मोहात पडू नये
पाकिस्तानातील क्रमांक पाहून 25 लाखांची लॉटरी म्हणजे काही तरी गडबड असल्याचे मला वाटलेच होते. ‘दिव्य मराठी’ने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे मी अधिकच सावध झाले. अशीच काळजी सर्वांनी घ्यावी. बिनाकष्टाच्या पैशाच्या मोहात पडू नये, हीच विनंती आहे. सुरेखा पांडव
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.