आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅग चोरीचा बनाव अंगलट,कर्जाचा तगादा टाळण्यासाठी 3 लाखांची बॅग चोरल्याचे नाटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कर्जाच्या परतफेडीसाठी मागे लागलेल्या तगाद्यातून काही दिवस का होईना उसंत मिळावी म्हणून त्याने नामी शक्कल लढवली. शहरातील बॅग चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपलीही पैशाची बॅग चोरट्याने हिसकावून नेली, असा बनाव त्याने केला. परंतु चाणाक्ष पोलिसांनी तो नाटक करीत असल्याची बाब हेरली आणि हा "नाटक'कारच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला. जवाहरनगर पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली असून बनाव करणारा व्यापारी गणेश राजाराम शेजूळ याच्यावरच पोलिसांनी कलम १८२ नुसार कारवाई केली असल्याचे जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील तेलुरे यांनी सांगितले.

गणेश राजाराम शेजूळ (३५, रा. देवळाई चौक) याचा देवळाई चौकात टायर रिमोल्डिंग आणि विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्याने एका गृहस्थाकडून तीन लाख रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत देण्यासाठी त्या गृहस्थाने शेजूळकडे तगादा लावला होता. मात्र, शेजूळ पैसे परत करण्यास असमर्थ ठरला. शहरात घडणाऱ्या बॅग चोरीच्या घटनांचा फायदा घेऊन काही दिवसांसाठी का होईना कर्जफेडीच्या तगाद्यातून मुक्त व्हावे म्हणून पोलिसांत तीन लाख रुपये असलेली बॅग चोरीस गेल्याची तक्रार द्यावी आणि समोरील व्यक्तीला पैसे परत देण्यासाठी आणखी काही दिवस मुदत मागावी, अशी भन्नाट कल्पना त्याला सुचली.

असाझाला बनाव उघड : शेजूळच्या तक्रारीवरून पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला. सहायक पोलिस आयुक्त सुदर्शन मुंढे आणि तेलुरे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. शेजूळने पूर्ण कथा पुन्हा सांगितली. मुंदडा हॉस्पिटलजवळ ही घटना घडल्याचे त्याने सांगितले होते. त्यानुसार या भागातील इमारतीवर लावलेले सर्व सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले. मात्र, कोणत्याही सीसीटीव्हीत शेजूळने सांगितलेल्या घटनास्थळी अशी कुठलीही घटना घडल्याचे दिसले नाही. त्यामुळे शेजूळ याची उलट चौकशी करताच कर्जाचा तगादा चुकवण्यासाठी बनाव केल्याचे त्याने कबूल केले, अशी माहिती निरीक्षक तेलुरे यांनी दिली.

अशी सुचली असावी कल्पना : गेल्या दोन दिवसांत शहरात बॅग चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यातील एक जवाहरनगरमध्ये घडली. मंगळवारी सिडको भागात हेमंत चौधरी (४९, रा. एन-८) हे त्यांच्या गाडीवर जाताना दोन व्यक्ती पल्सरवर आले. त्यांनी पाठीमागून चौधरींच्या दुचाकीच्या हँडलला लावलेली बॅग हिसकावली. या बॅगेत ८५ हजार रुपये रोख आणि सारस्वत बँकचे पासबुक होते.

अशी रचली बॅग चोरीची कहाणी
शेजूळनेबुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जवाहरनगर ठाणे गाठून तक्रार दिली. या वेळी पोलिस निरीक्षक तेलुरे ठाण्यातच होते. मी हेडगेवार हॉस्पिटलच्या मागील बाजूने दुचाकीवर जात असताना एका दुचाकीस्वाराने मला कट मारला. त्यामुळे त्याचे अन् माझे भांडण सुरू असताना दुसऱ्या दुचाकीवर दोन व्यक्ती आल्या. त्यांनी लाख रुपये असलेली माझी बॅग पळवली, असे त्याने तक्रारीत लिहिले.