आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

108 क्रमांकावर खोटी माहिती कळवून डॉक्टरांची दिशाभूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - अपघातासह इतर आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना तत्काळ मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने गावोगावी अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू केल्या आहेत. संपर्कासाठी 108 क्रमांक देण्यात आला आहे; परंतु या क्रमांकावर अपघात झाल्याची खोटी माहिती कळवून डॉक्टरांची दिशाभूल केली जात आहे.
वेरूळ येथे रुग्णवाहिकेवर डॉ. सारंग पाटणी व चालक प्रभाकर बोडखे कार्यरत असताना 25 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास 108 क्रमांकावरील कॉलसेंटरवरून दूरध्वनी आला व पळसवाडी गावाजवळ इंडिका कारचा अपघात झाला असून त्यात सहा जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच 8975569373 या क्रमांकावर संपर्क करण्याचे सांगण्यात आले. यानंतर काही वेळातच रुग्णवाहिका पळसवाडी येथे दाखल झाली; परंतु येथे अपघात झाला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
डॉक्टरांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे सांगण्यात आले. याच दरम्यान तालुक्यातील गदाणा येथे खरोखर अपघात घडला होता; परंतु पळसवाडीत रुग्णवाहिका अडकल्याने खर्‍या अपघातास्थळी रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही.

गुन्हा दाखल
खोट्या कॉलमुळे दिशाभूल होऊ शकते; परंतु खरोखर अपघात झाला, तर डॉक्टरांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे खोटे कॉल करणार्‍यांवर खुलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल केला, असे रुग्णवाहिकेवरील डॉ. सारंग पाटणी यांनी सांगितले.
छायाचित्र - वेरूळ येथे रुग्णसेवेसाठी सज्ज असलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका.