आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबानेच पाय ओढल्याने यशस्वी स्त्री होऊ शकले नाही - दामिनीफेम कांचन अधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दूरदर्शनवर आठ वर्षे नंबर एक राहिलेल्या ‘दामिनी’, ‘चोरावर मोर’ आणि ‘उचापती’सारख्या दमदार मालिका करणाऱ्या कांचन अधिकारींनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. त्याच काळात छोट्या पडद्यावरील सम्राज्ञी होण्याची ताकद असलेली महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, पुढे त्या अचानकच छोट्या पडद्यापासून लांब झाल्या. एकता कपूरप्रमाणेच माझ्यातही क्षमता होती. मात्र, कुटुंब आणि विशेषत: पतीने साथ दिल्याने सर्वात यशस्वी स्त्री होता आले नाही, असा खळबळजनक खुलासा प्रख्यात निर्माती, दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी केला.

एका चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने त्यांनी दिव्य मराठी कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या. दोन तासांच्या दिलखुलास गप्पांमध्ये त्यांनी अनेक गुपिते उलगडली. दिग्दर्शनाला रामराम ठोकणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. यासोबत आजवरच्या प्रवासातील प्रक्रिया मी भरभरून जगले, असेही त्यांनी सांगितले.

अधिकारी म्हणाल्या, माझ्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये चित्रपट, मालिका मी केल्या. हे मनोरंजनासाठी नव्हे तर समाजात मला भावणाऱ्या, खटकणाऱ्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी मी केले. मला मुळीच हिट देणारी निर्माती किंवा दिग्दर्शिका बनायचे नव्हते. आपल्या समाजात स्त्री-पुरुष यांच्या श्रमविभाजनापासून महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. ही बाब मला कायम खटकत होती. मुलींना स्वयंपाक आणि मुलांना बाहेरची कामं अशी आपली मानसिकता आहे. ती पूर्णपणे बदलायला हवी. हे विभाजन मुलगा आहे किंवा मुलगी यावर मुळीच निश्चित होऊ नये. दोघांनाही दोन्ही कामे दिली जातील तेव्हा या मानसिकतेत बदल होईल.
दिग्दर्शिका म्हणून वावरताना महिला म्हणून मलाही अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. महिलांना गृहीत धरण्याची प्रवृत्ती खोलवर रुजली आहे. यासाठी पुरुष जबाबदार नाहीत तर महिलाच जबाबदार आहेत. त्याग, समर्पण हे आपण आनंदाने स्वीकारले म्हणून आपल्याला कायमच गृहीत धरले जाते. मला आमदारकीचे तिकीट मिळत होते, पण पती मार्कंडने ते मिळू दिले नाही, याचाही उल्लेख त्यांनी केला. हल्ली मराठीत अनेक चांगल्या विषयांवर चित्रपट येत आहेत. मात्र, “सैराट’सारखा चित्रपट सर्वाधिक यश कमावतो याचे कारण त्यात दाखवलेले समाजाचे वास्तव चित्रण आहे. हेच निर्माता-दिग्दर्शकांकडून अपेक्षित आहे.
पुरस्कारांत मुद्दाम डावलले जाते
मी केलेल्या चित्रपटांतील अनेक कलावंतांना, कथेला, पटकथेला, संगीताला पुरस्कार मिळाले. मात्र, जेव्हा दिग्दर्शनासाठी पुरस्काराची वेळ येते, तेव्हा मात्र मला डावलले जाते. माझ्या चित्रपटांची खूप चर्चा झाली; पण माझे काम दुर्लक्षित केले गेले, अशी खंतही कांचन अधिकारी यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...