आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळी असून अडचण नसून खोळंबा; शेतकरी मेटाकुटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - शेततळ्यासाठी अनुदान मिळाले, शेततळे तयार झाले, परंतु त्यात टाकण्यासाठी लागणारे पाणकापड घेण्यासाठी पैसे नसल्याने खुलताबाद तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची शेततळी पडीक पडल्याचे चित्र आहे. शासनाच्या वतीने दीड ते दोन लाख रुपयांच्या पाणकापडासाठी कोणतीही तरतूद नसल्याने शेततळी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेकांनी तर शेततळे तयार केले, परंतु पाणकापड नसल्याने ना पीक ना पाणी अशी शेतीची अवस्था झाली आहे. म्हणजे जमीनही पडीक, त्यात पाण्याचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. एकूणच राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेचा खुलताबाद तालुक्यात फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे.

दुष्काळाने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी केंद्रासह राज्य शासन अनेक योजना राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने दुष्काळ निवारणासाठी २००५ मध्ये शेतकऱ्यांसाठी शेततळे योजना सुरू केली. शेततळे योजनेच्या किचकट अटी व नियमांमुळे आजरोजी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी अडकून पडल्या आहेत.

कृषी विभागाने योजनेप्रमाणे मागेल त्याला शेततळे दिले, तर योजना शंभर टक्के अनुदानाची असल्याने शेतकऱ्यांनीही ती स्वीकारली. काही शेतकऱ्यांची शासनाच्या वाट्यासह स्वत: पैसे अडकवले. यातील अनेक अडचणी विभागाने शेतकऱ्यांना सांगितल्या. परंतु शेततळ्यामुळे शेतात पाणी येईल या अपेक्षेने शेतकऱ्याने शेततळे घेतले. परंतु त्यात पाणकापड नसल्याने शेततळी आजघडीस पडीक पडली आहेत. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे. खुलताबाद तालुक्यात २००५ पासून ते २०१६ पर्यंत एकूण २१९ शेततळी तयार केली. त्यापैकी १९ शेततळी हे पाणकापडाची, तर २०० शेततळी विनापाणकापडाची आहेत. विनापाणकापडाची शेततळी शेतकऱ्यांच्या काहीही उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे जमिनी अडकून पडल्या आहेत. त्यासाठी शासन, प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

अर्ज करावेत
ज्या शेतकऱ्यांकडे फळबागा अाहेत व शेततळी असतील अशा फळबागायतदारांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रमांतर्गत ५० टक्के अनुदानावर पाणकापड दिले जाईल. त्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान देता येईल.
- व्ही. एस. हंगे, तालुका कृषी अधिकारी.

निधी द्या किंवा तरतूद करावी
मागील वर्षी शेततळे घेतले, परंतु ते विनापाणकापडाचे असून त्याचा उपयोग होत नाही. शेततळ्यासाठी पाणकापड जरुरीचे आहे. शासनाने तरतूद करावी. अनुदान देता येत नसेल तर शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी तरतूद करावी. त्यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल.
- अरुण काळे, शेतकरी, ताजनापूर
बातम्या आणखी आहेत...