आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तू पाणी पाजण्यास ये... मी आत्महत्या करतोय; मुलाला फोनवर सांगून हतबल पित्याने घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाना गाडेकर - Divya Marathi
नाना गाडेकर
बोरगाव अर्ज- ‘मी एका खासगी फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या तगाद्याने कंटाळलो आहे. त्यामुळे आज मी आत्महत्या करणार असून मी मेल्यानंतर तू उद्या पाणी पाजण्यासाठी ये,’ असे स्वत:च्या मुलाला मोबाइलद्वारे कळवून हतबल शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन अात्महत्या केली. ही दुर्दैवी घटना फुलंब्री तालुक्यातील गिरसावळी येथे गुरुवारी (दि. २५) रात्री सात वाजेदरम्यान घडली. नाना पुंजाबा गाडेकर (४७) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

शुक्रवारी (दि. २६) शवविच्छेदन झाल्यानंतर मृताचे नातेवाईक मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी फुलंब्री पोलिस ठाणे गाठून संबंधित फायनान्स कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, अजिनाथ नाना गाडेकर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आम्ही घरासाठी एका फायनान्स कंपनीकडून लाख २५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील काही हप्तेही भरले. परंतु आता हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी चव्हाण हे वडिलांना नेहमी फोन करून लवकर हप्ता भरा, अन्यथा घर खाली करून ताबा घेऊ किंवा तुमच्यावर केस करू, असे सातत्याने त्यांना धमकावत. 

या वर्षी शेतात उत्पन्न कमी झाले, मी औरंगाबादला शिक्षण घेतो थोडेफार काम करून घराला हातभार लावतो. परंतु आर्थिक अडचणीमुळे हप्ता थकला होता. पैशांची जुळवाजुळव झाली की हप्ता भरून टाकू. परंतु फायनान्स कंपनीतील अधिकारी हे ऐकता माझ्या वडिलांना मानसिक त्रास द्यायचे धमकवायचे. या फिर्यादीवरून फुलंब्री पोलिस ठाण्यात फायनान्स कंपनीचे चव्हाण यांच्या विरोधात भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव करत आहेत. 

अखेरचे बोल : लाडक्या मनूला घरातील सगळ्यांना जीव लाव 
‘अजिनाथतू शिक्षण घेऊन खूप मोठा हो, लाडक्या मनूला घरातील सगळ्यांना जीव लाव. फायनान्स कंपनीच्या चव्हाण साहेबांनी लय परेशान केलं. मी आता आत्महत्या करतो, तू माझ्या मौतीला पाणी पाजण्यासाठी घागर घेऊन ये,’ असे सांगून त्यांनी फोन कट केला. त्यानंतर बऱ्याच वेळेस वडिलांचा फोन लावला. पण फोन लागेना. त्यामुळे गावात फोन करून सांगितले. त्यामुळे काही ग्रामस्थांनी घराकडे धाव घेतली असता वडील नाना गाडेकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. 

ढोरकीन येथेही शेतकऱ्याची आत्महत्या 
स्वत:च्या घरात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विलास विठ्ठलराव कान्हे (४०) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. घर कुणी नसल्याची संधी साधून घराच्या वरच्या मजल्यावरील घरात दोरीने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विलास कान्हे यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांनी तपासून मृत घोषित केले. शुक्रवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन फौजदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात ढोरकीनचे बीट जमादार सोमनाथ जाधव, जाकीर शेख, सतीश राऊत करत आहेत. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, तीन भाऊ असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...