आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकी, कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - गंगापूर तालुक्यातील सिरजगाव येथील सुनील सयाजी काळे (४२) या शेतक-याने सोमवारी नापिकी व बँकेचे कर्ज, मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च व मुलीच्या लग्नाची चिंता या कारणाने घरातील ओसरीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील काळे यांना एकूण ७ एकर जमीन होती. त्यापैकी साडेतीन एकर त्यांच्या व साडेतीन एकर मुलाच्या नावावर होती.
त्यांनी खरिपासाठी साडेतीन एकरमध्ये सोयाबीन या पिकाची लागवड केली होती. परंतु पावसाअभावी ते उगवलेच नाही. तर उर्वरित साडेतीन एकरमध्ये कापसाची लागवड केली होती. परंतु पाण्याअभावी कापसाच्या पिकानेदेखील दगा दिला. त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर गंगापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे ८५ हजार रुपयांचे पीककर्ज होते. सुनील काळे यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार असून त्यातील मोठी मुलगी बारावीला तर मुलगा अकरावीला शिकत असून एक मुलगा लहान आहे. मुला-मुलीचे शिक्षणासाठी लागणारा खर्च, बारावी परीक्षेनंतर मुलीचे लग्न करण्याचा त्यांचा विचार होता. दुष्काळामुळे ते मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतवस्तीवरील घरातील ओसरीमध्ये कोणी नसताना गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

भिवधानोरा येथे तरुणाची आत्महत्या
गंगापूर । तालुक्यातील भिवधानोरा येथील संतोष सजन जोशी (२४) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष याने सोमवारी पहाटे विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.