आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणच्या लालफितीचा शेतकर्‍यांना झटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामदास घोले शहराजवळील आडगावातील एक सामान्य शेतकरी. पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील उभी पिके वाचवण्याच्या चिंतेने त्रस्त. शेतातील विहिरीत पाणी आहे, मोटर आहे; पण तरीही पिके तहानलेली आहेत. कारण गेल्या दीड वर्षापासून तो वीज कनेक्शनची प्रतीक्षा करत आहे. वीज कनेक्शन नसल्याने उभी पिके करपत असताना हताशपणे पाहण्याशिवाय त्यांच्या हाती काही नाही; रामदास घोले हे एक प्रातिनिधिक उदाहरण. वीज कंपनी आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभाराचा जिल्ह्यातील 3569 शेतकर्‍यांना झटका बसला आहे. यासाठी 34 कोटी देऊन नेमलेला ठेकेदार फक्त सर्वेक्षण करत आहे, तर महावितरण कंपनी ठेकेदाराकडे बोट दाखवून गप्प बसली आहे.

गतवर्षी दुष्काळात आणि सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांना पिके वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे; पण शेतकर्‍यांच्या मदतीच्या बाता करणारे सरकार आणि त्याच्या संलग्न कंपन्या मात्र त्यांची ससेहोलपट करत आहेत. आडगावातील रामदास घोले या शेतकर्‍याने वीज कनेक्शनसाठी 16 एप्रिल 2012 रोजी कनिष्ठ अभियंता चिकलठाणा (ग्रामीण) वीज कार्यालयात अर्ज केला. तत्कालीन कनिष्ठ अभियंता विजय भिवसने यांनी आडगावातील लाइनमनला जोडणी करावयाचे ठिकाण ते डीपीचे अंतर याचे सव्र्हे करण्यास सांगितले. गट क्रमांक 148चा सव्र्हे केल्यानंतर घोले यांना दोन पोल आणि तारांचे कोटेशन देण्यात आले. त्यांनी कोटेशनचे 4470 रुपये आणि बेबाकी बिल जिल्हा बँकेत जमा केले. पैसे भरून दीड वर्ष झाले; पण अजूनही ना तारा मिळाल्या ना पोल. घोले यांच्या प्रकरणातून डीबी स्टारने स्टिंग करून कंपनीचे काम कसे चालते याचा पर्दाफाश केला.

खासगी कंपनीला कंत्राट
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड, वैजापूर आणि सोयगाव भागात पोल उभे करणे, वीज कनेक्शन जोडणी, रोहित्रे बसवणे, एच. टी., एल. टी. लाइन जोडणे, नवीन कनेक्शन देणे या पायाभूत कामासाठी महावितरणने सुदर्शन इलेक्ट्रिकल्स या खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कामापोटी कंपनीला महावितरणने 34 कोटी रुपयांची निविदा ई टेंडर पद्धतीने जुलै 2013 मध्ये काढली आहे, अशी माहिती महावितरणने दिली.

थेट सवाल
शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण, औरंगाबाद

शेतकर्‍यांना वीज कनेक्शन देण्यात विलंब होत आहे?
- प्रश्न एका शेतकर्‍याचा नाही. हजारो शेतकर्‍यांचा विचार करून बजेट तयार केले जाते. अशा कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवावी लागते. मग काम सुरू होते. परिणामी या प्रक्रियेला काही कालावधी लागत असतो.
साधारणत: किती दिवसांत वीज कनेक्शन मिळणे अपेक्षित आहे?
-जर ट्रान्सफॉर्मरजवळ असेल आणि तांत्रिक कामे कमी असतील तर प्राधान्यक्रमाने एका महिन्यात काम मार्गी लागते.
कर्मचारी, अभियंते टोलवाटोलवीची उत्तरे देतात? नेमकी चूक कोणाची?
-जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे वागतो. ग्राहकांना नीट समजावून सांगितले तर शेतकरी फारशा तक्रारी करत नाहीत.
शेतकर्‍यांना वीज कनेक्शन कधीपर्यंत मिळतील?
जिल्ह्यातील सर्व कामे 2013 अखेर होणार आहेत. मार्च 2010 ची कामे पूर्ण केली आहेत .एक हजार ग्राहकांमागे एक सबस्टेशन करावे लागते. यासाठी कर्ज मंजूर करावी लागतात. परिणामी थोडा विलंब होत आहे.

यात प्रचंड भ्रष्टाचार आहे
जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्याने याबाबत महावितरण कार्यालयात बैठक घेतली आहे. मुख्य अभियंता यांना जाब विचारला. कोण सुदर्शन इलेक्ट्रिकल्स मला अजून माहीत नाही. महावितरणने मला कल्पना दिली नाही. यात मोठा भ्रष्टाचार आहे. तो उघड करण्याचे काम मी करत आहे. पुढच्या आठवड्यात याच विषयावर पुन्हा बैठक घेणार आहोत. - चंद्रकांत खैरे, खासदार, अध्यक्ष, विद्युत वितरण सल्लागार समिती

तत्काळ अर्ज निकाली काढणार - पंधरा दिवसांत काम मार्गी लागेल. तक्रार करण्याची गरज नव्हती. हा मोठा विषय नाही. उपविभाग क्रमांक 2 मध्ये 1687 लोकांचे विद्युत पंप, विद्युतीकरणासाठी अर्ज आले आहेत. ठेकेदाराला सांगून हे अर्जही निकाली लावणार आहे. -नितीन चंदनमोर,सहायक अभियंता, महावितरण

महावितरणच्या याद्यांप्रमाणे काम
महावितरणने आम्हाला 31 मार्च 2010 ते 31 मार्च 2012 दरम्यानच्या याद्या दिल्या आहेत.ज्यांचे कोटेशन 1 एप्रिल 2012 च्या आधीचे आहे त्यांचे काम करण्यासाठी सव्र्हे चालू आहे. 4 एप्रिल 2012 नंतरची कामे महावितरणच्या इंप्रा प्रोजेक्टमध्ये घेतली आहेत. ही कामे दुसर्‍या टप्प्यात होणार आहेत. ही कामे एम.डी. लेव्हलवर असून आतापर्यंत 1260 लोकांच्या याद्या आल्या आहेत. या यादीत जर रामदास घोलेंचे नाव असेल तर काम तत्काळ करण्यात येईल.- अशोक भोसले, संचालक, सुदर्शन इलेक्ट्रिकल्स, उस्मानाबाद

वीज कनेक्शनसंदर्भात अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून तर्‍हेवाईक उत्तरे आणि मग्रुरीची भाषा ऐकायला मिळाली. योग्य उत्तर न देता एका दुसर्‍याची नावे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. एक सामान्य शेतकरी आणि घोले यांचा नातेवाईक म्हणून डीबी स्टार चमूने अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता मिळालेली ही काही उत्तरे.
दिनकर पवार
कनिष्ठ अभियंता, चिकलठाणा (ग्रामीण)

शेतकरी : नमस्कार साहेब
पवार : कोण
शेतकरी : साहेब, मी वीज कनेक्शनसाठी अर्ज केला आहे.
पवार : कोणता अर्ज, कोणती वीज जोडणी, मला काही माहीत नाही.
शेतकरी : साहेब, मी आपल्याकडे अर्ज जमा केला आहे
पवार : मला माहीत नाही, तुम्ही नितीन चंदनमोर यांना भेटा

एस. एम. सातपुते
कनिष्ठ तंत्रज्ञ

शेतकरी : माझ्या वीज कनेक्शनचे काय झाले?
सातपुते : माझ्याकडे काही नाही, चंदनमोर, पवार, काकडे, हुमने किंवा शंकर शिंदे साहेबांना भेटा
शेतकरी : तुम्हीच काही तरी बघा
सातपुते : आमच्या हातात काही नाही. सव्र्हे करून रिपोर्ट पाठवणे हे आमचे काम.
शेतकरी : मग तारा, पोल.
सातपुते : माझ्याकडे मटेरियलचे अधिकार नाहीत.

रणजित देठे
व्यवस्थापक, सुदर्शन इलेक्ट्रिकल्स

शेतकरी : नमस्कार साहेब,
देठे : बोला कोण.?
शेतकरी : साहेब, मी वीज कनेक्शनसाठी अर्ज केलाय..
देठे : मग?
शेतकरी : साहेब, दीड वर्ष झाले.
देठे : सव्र्हे केल्याबरोबर लगेच काम होत नाही. इतरांसोबत काम होईल, आणखी 15 दिवस लागतील.
शेतकरी : पण कधीपर्यंत?
देठे : सध्या 2010 ची खंडित कामे सुरू आहेत, 1260 लोकांची यादी चंदनमोर यांनी दिलेली आहे. तीच कामे होत नाहीत. नव्याचे काय घेऊन बसलाय. चंदनमोर साहेबांना भेटा. तुमचे नाव यादीत नाही.

नितीन चंदनमोर
सहायक अभियंता, महावितरण

डीबी स्टार चमूने नितीन चंदनमोर यांना गाठले
शेतकरी : साहेब, आमच्या कनेक्शनचे काय झाले.
चंदनमोर : काय झाले.
शेतकरी : साहेब अजून काम झाले नाही
चंदनमोर : आमदार साहेबांच्या पी.ए.चाही या प्रकरणी फोन आला होता. तीन, चार महिन्यांत काम होईल.
शेतकरी : बरं
चंदनमोर : घोलेंना सांगा विनाकारण किस पाडू नकोस म्हणावं.