आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमाल भावाची पद्धती चुकीची - पाशा पटेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळेच शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. शेतीमालाचे भाव अनेक वर्षांपासून चुकीच्या पध्दतीने ठरवण्यात येतात. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागाची माती झाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे माजी आमदार व शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्य शेतमाल भाव समितीच्या तांत्रिक उपसमितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला उपस्थित असलेल्या पटेल यांनी मंगळवारी नगरमध्ये शासकीय विर्शामगृहात पत्रकार परिषद घेऊन शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
ते म्हणाले, आतापर्यंत राज्यात अस्तित्वात असलेल्या शेतमाल भाव समितीच्या कधीच बैठका झाल्या नाहीत. शासनाने आता ही समिती बरखास्त करून नवीन शेतमाल भाव समिती स्थापन केली आहे. राज्याचे कृषिमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असून कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, विभागप्रमुख, दहा आमदार व आठ शेतकरी या समितीचे सदस्य आहेत. या समिती अंतर्गत असलेल्या तांत्रिक उपसमितीची पहिली बैठक पंधरा दिवसांपूर्वी मुंबई येथे झाली असून दुसरी बैठक सोमवारी (13 ऑगस्ट) राहुरी येथे झाल्याचे ते म्हणाले.
पीक उत्पादन खर्च काढण्याच्या विविध पध्दतींवर चर्चा करून एक पध्दत निश्चित करणे, केंद्र व राज्य शासनाच्या पीक उत्पादन खर्च काढण्याच्या पध्दतीत एकसूत्रता आणणे, पीक उत्पादन खर्च, योजनेच्या कार्यकक्षा, कार्यपध्दती व सुधारणेबाबत चर्चा करून निर्णय घेणे यासारख्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. शेतीमालाचा भाव ठरवण्यासाठी कोणतीही पध्दत वापरा, मात्र शेतकर्‍यांच्या शेतीमालाला बाजारातील वास्तव दराप्रमाणे भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी बैठकीत केली असल्याचे पटेल यांनी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेचा तीन महिन्यांच्या आत कच्चा मसुदा तयार करण्यात येणार असून पुढील बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे पटेल म्हणाले.