आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडमध्ये आधुनिक अवजारांना शेतकर्‍यांची पसंती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड: विविध क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कुशल मनुष्यबळाची कमतरता, वेळेची बचत आणि प्रक्रियेसाठी लागणारा अवाढव्य खर्च यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. शेतीव्यवसायही यात मागे राहिला नसल्याचे दिसून आले आहे. पावसाची अनिश्चितता, पोषक वातावरणाची कमतरता, मजुरांची तीव्र टंचाई, रासायनिक खतांचे न परवडणारे दर, वाढती मजुरी, महागाईचा उच्चांक, विजेचे वाढते भारनियमन आणि वाढते दर, शासनाचे उदासीन धोरण, या सर्व बाबींमुळे काबाडकष्ट करूनही पिकवलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळत नाही. शेतकरीवर्ग कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. चाणाक्ष व्यापारी मात्र तेजीत आहेत. या सर्व बाबींमध्ये फायद्या-तोट्याचा विचार न करता शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे तसेच व्यापारी पद्धतीने शेतीकडे वळला आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने सर्वच क्षेत्रांमध्ये त्याचा वाढता वापर पाहता शेती व शेतकरीदेखील तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहे. ट्रॅक्टर, ठिबक सिंचन यांच्यासोबत विविध प्रकारचे आधुनिक अवजारे, शेतीव्यवसायात वाढत आहेत. सध्याच्या काळात तिफण, कोळपे, वखर आदी शेती अवजारे हद्दपार होत असताना दिसत आहेत. शेतीसाठी लागणार्‍या लाकडी अवजारांची किंमत शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. मजुरी व दुरुस्ती खर्च परवडणारा नसल्याने तुलनेत लोखंडी अवजारे देखभालीस व वापरास सोईस्कर असल्याने लाकडी अवजारे दुर्लक्षित होत चालली आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांचा कलही बदललेला दिसून येत आहे. आता शेतकरीवर्ग नगदी पिके म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशी, हळद, अद्रक, मका, भुईमूग, केळी आदी पिकांकडे वळला आहे. सध्या बैलजोडीच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. मजुरांची टंचाई हा यक्षप्रश्न बनला आहे. मजूर मिळाले तरी त्यांना द्यावी लागणारी मजुरी शेतकरीवर्गास परवडणारी नाही. यामुळे शेतकरी वर्गाचा कल ट्रॅक्टरकडे वाढला आहे. आधुनिक यंत्रामुळे मजूर व मजुरीचा प्रश्न सुटून वेळीच बचत होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व्यापारी तत्त्वावर शेती करण्यास शेतकरी उद्युक्त होत आहे.