आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांसाठी मदतीची गुढी; शेळके कुटुंबासाठी मदतीचे हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गारपिटीच्या तडाख्यात सारे काही उद्ध्वस्त झाल्याने निराश झालेल्या महादेव शेळकेने आत्महत्या केल्याने आधार गमावलेल्या पठाण मांडव्याच्या शेळके कुटुंबासाठी आता चहुबाजूंनी मदतीचे हात पुढे येत आहेत. ‘दिव्य मराठी’त या कुटुंबाची कहाणी वाचून ही मदतीची गुढी उभारली गेली आहे. आजपर्यंत अशोक शेळके व संजीवनी शेळके यांच्या संयुक्त बँक खात्यात 14 हजार रुपयांची मदत जमा झाली असून खडबडून जागे झालेल्या शासनानेही एक लाख रुपयांची मदत दिली आहे.

पठाण मांडवा (ता. अंबाजोगाई) येथे 14 मार्चला महादेव शेळके या तरुणाने आत्महत्या केली होती. ‘दिव्य मराठी’ने गेल्या आठवड्यात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा मांडून 24 मार्चला शेळके कुटुंबाची अवस्था वर्णन करणारा वृत्तांत प्रकाशित केला होता. मोलमजुरीवर जगणार्‍या या अल्पभूधारक कुटुंबावर कुर्‍हाड कोसळली असून एक कमावता हात गेल्याने कुटुंब आधार गमावल्यासारख्या अवस्थेत आहे. महादेवच्या बहिणीने या दु:खातही दहावीची परीक्षा देत पुढे शिक्षण घेण्याची जिद्द दाखवली आहे.

या बातमीसोबतच अशोक शेळके व संजीवनी शेळके यांच्या बडोदा बँकेच्या संयुक्त खात्याचा क्रमांक देण्यात आला होता. राज्यभरातून मदतीचे हात पुढे आले. तीन दिवसांत खात्यावर 14 हजारांची मदत जमा झाली. याशिवाय प्रशासनही जागे झाले आणि एक लाख रुपयांची मदत या कुटुंबाला मिळणार आहे.

औरंगाबादच्या डॉ. विजय दामोदर पांगरेकर यांनी शेळके कुटुंबाला 12 हजार रुपयांची मदत दिली. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ला ई- मेलवरून त्यांनी आपल्या भावना कळवल्या. प्रातिनिधिक स्वरूपात त्या देत आहोत...
‘शेळके कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीचे वृत्त वाचून त्यांना प्रारंभी ३ हजार रुपये मदत पाठवणार होतो. पण या कुटुंबावर कोसळलेली आपत्ती एवढी मोठी आहे की त्यातून बाहेर काढण्यासाठी मोठी रक्कम पाठवणे जरुरी आहे. सरकार किंवा राजकीय पक्ष किती आणि केव्हा मदत पाठवतील कोण जाणे. म्हणून १२ हजार रुपये पाठवले. एका दु:खी शेतकरी कुटुंबाला मदत करू शकलो याचा मला आनंद आहे. ‘दिव्य मराठी’मुळे हे शक्य झाले.शेतकरी शेतात राबतो. कष्ट करतो. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ पिकवतो. आपण शहरातील लोक त्यामुळे रोज पोळी, भाजी, भाकरी खातो. सणाला पुरणपोळी खातो. पण गारपीट झाल्यामुळे आपल्याला खाऊ घालणारा शेतकरी उपाशी राहतो, त्याचे कुटुंब उपाशी झोपते हे चित्र चांगले नाही. शेतकरी उपाशी राहायला नको, त्याची मुले शिक्षणाअभावी वंचित राहायला नकोत. त्यामुळेच मी कर्तव्याच्या भावनेतून हे काम केले. त्याचे मला समाधान आहे.’