आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय झालर: अल्पभूधारक शेतकरी होणार भूमिहीन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडकोने नुकताच प्रसिद्ध केलेला झालरक्षेत्राचा आराखडा पिसादेवी येथील अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. आराखड्यात पिसादेवीच्या शेतकर्‍यांच्या गुठय़ांमध्ये असलेल्या जमिनी, घरे, प्लॉट, गोठे व खळवाड्यांवरही आरक्षण टाकण्यात आले आहे. नवीन प्रारूप आराखड्याने शेतकर्‍यांना भूमिहीन बनवण्याची भूमिका बजावली असून आराखड्यातील आरक्षणांना राजकीय झालर प्राप्त झाली आहे.

सिडकोने 2 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या 28 गाव झालरक्षेत्र प्रारूप आराखड्याचे पैलू हळूहळू उलगडू लागले आहेत. पिसादेवी परिसरातील शेतकर्‍यांनी झालरक्षेत्राच्या आराखड्यावर प्रकाश टाकणारे निवेदन प्रसारमाध्यमांना दिल्यानंतर आरक्षण टाकताना अल्पभूधारक शेतकर्‍यांची मोठय़ा प्रमाणावर परवड केल्याचे स्पष्ट होते. अनेकांची जमीन आरक्षणात दाखवल्यानंतर घरावर रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले आहे. जनावरांचे गोठेही आरक्षणातून सुटले नसल्याचे शेतकर्‍यांनी निदर्शनात आणून दिले आहे.

पिसादेवी परिसरातील गट नं. 42, 43, 36 मध्ये रमेश गवनाजी, गोरख जवनाजी, रामभाऊ गवनाजी यांची अनुक्रमे 18, 18, 18 गुंठे जागा आरक्षणाच्या कक्षेत आणली. देवराव यशवंता यांच्याही 54 गुंठे जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस नंदकिशोर काळे व त्यांच्या बंधूंची गट नं. 136 मध्ये सात एकर जमीन असून जागा फिश मार्केट व स्टेडिअमसाठी आरक्षित केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती रघुनाथ काळे यांच्या सात एकर जमिनीवर खेळाचे मैदान व शॉपिंग मॉलचे आरक्षण टाकले आहे. ग्रामपंचायत सदस्य संतोष काळे यांच्या गट नं. 8 वरही आरक्षण टाकले आहे.

गट क्र. 9 मध्ये काकासाहेब दामू, पंढरीनाथ दामू, संजय दामू यांची प्रत्येकी 44 गुंठे, बबन रावसाहेब, संतोष रावसाहेब यांची प्रत्येकी 33 गुंठे, गट क्र. 60 मध्ये कैलास दादाराव, शेषराव रामराव, सकुबाई दादाराव धामणे यांच्या प्रत्येकी 18 गुंठे जमिनीवर आणि गट.क्र. 65 मध्ये स्मशानभूमीचे आरक्षण टाकण्यात आले असून याशिवाय र्शीपत जाधव व त्र्यंबक जाधव यांची प्रत्येकी 44 गुंठे जागा आरक्षित करण्यात आली आहे.

राजकीय षड्यंत्राचा बळी
जिल्हा परिषदेचा सभापती झाल्याने माझ्यावर स्थानिक नेतृत्वाचा राग आहे. मोठय़ा राजकीय षड्यंत्राचा बळी ठरलो आहे. माझ्या शेतावर शॉपिंग मॉल व खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. एकीकडे गट. क्र. 9, 136 व 119 वर स्टेडिअमचे आरक्षण असताना माझ्या जमिनीवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्याचे प्रयोजन लक्षात येत नाही.
-रघुनाथ काळे, माजी सभापती

मी भूमिहीन झालो!
सिडकोच्या रद्द केलेल्या झालरक्षेत्र आराखड्यात माझ्या समोरच्या गटावरील जमिनीवर आरक्षण होते. या वेळी गट. नं. 65 मधील आम्हा दोघा भावांच्या प्रत्येकी 44 गुंठय़ांवर स्मशानभूमीचे आरक्षण टाकले आहे.
-त्र्यंबक जाधव, रहिवासी

मंत्रिपद न मिळाल्याचा रोष काढला
गावची ग्रामपंचायत हातून गेल्यामुळे स्थानिक आमदाराने अधिकार्‍यांना दबावाखाली घेऊन विरोधकांना भूमिहीन करण्याचा केलेला प्रयत्न आहे. स्थानिक आमदारांच्या जमिनीवर रद्द झालेल्या आराखड्यात आरक्षण होते. या वेळी मात्र अधिकार्‍यांनी त्यांच्या जमिनी सहीसलामत बाहेर काढल्या.
- नंदकिशोर काळे

आमदार डॉ. काळे पंढरीच्या वारीला
फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. कल्याण काळे पंढरीच्या वारीला गेलेले असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. आमदार काळे पिसादेवी येथील रहिवासी आहेत. डॉ. काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे यांच्याशी संपर्क झाला असता आमदार काळे वारीला गेल्याचे त्यांनी सांगितले.

आराखडा चुकीच्या वेळी प्रसिद्ध
प्रारूप आराखडा चुकीच्या वेळी प्रसिद्ध केल्याची तक्रार पिसादेवी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी विठ्ठलाच्या वारीला निघून गेले आहेत. आक्षेप अर्ज दाखल करताना मोजणी नकाशा जोडणे अनिवार्य केले आहे. मोजणी कार्यालयात पावसाळ्यात मोजणी होत नाही. मोजणीची फी भरली तरी तीन चार महिने मोजणीसाठी अधिकारी वेळ देत नाहीत.