आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएमआयसी प्रकल्पातील शेतक-याची जमीन हरवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीएमआयी प्रकल्पात बिडकीन येथील अनेक शेतक-यांच्या जमिनी गेल्या. प्रत्येकाला सरकारने मोबदला देऊन भूसंपादन करण्याची प्रक्रिया राबवली. यात बिडकीन येथील कोथंबिरे कुटुंबीयांचाही समावेश आहे. आसाराम पुंजाजी कोथंबिरे यांच्या नावे 39 एकर जमीन होती. त्यांनी ती आपल्या सहा मुलांना वाटून दिली. प्रत्येकाच्या वाट्याला साडेसहा एकरचा हिस्सा आला.

डीएमआयसीत गेल्या जमिनी
डीएमआयसी या प्रकल्पात सर्व भावांच्या जमिनी गेल्या. सर्वांना समसमान मोबदला मिळणार होता. मोबदल्याची यादी झळकली आणि सर्व भाऊ ती बघण्यासाठी गेले. तेव्हा यातील रामनाथ कोथंबिरे या भावाच्या नावावर केवळ साडेचार एकरचाच मोबदला मिळणार, अशी नोंद होती. त्यामुळे सगळेच धास्तावले.

कुठे गेली जमीन
मुलगा सुरेश याने पैठण-फुलंब्री भूसंपादन कार्यालयाच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात अनेक खेट्या घातल्या. तेव्हा असे लक्षात आले की, तेथील पाझर तलावासाठी जमीन संपादन करताना शासनाने कोथंबिरे यांच्या मूळ 39 एकर जमिनीतील दोन एकर जमीन पूर्वीच संपादित केली असल्याचे समोर आले.

अधिका-यांची चूक
भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिका-यांनी जमीन संपादित करताना मोजमाप करून उपलब्ध जमिनीची माहिती सातबा-यांवर नोंद करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता केवळ जमीन संपादित केल्याचा अर्धवट शेरा सातबाºयावर लावला. परिणामी जमीन तर गेली, परंतु ती कुणाची याची नोंदच केली नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीत जमीन गेली कुणाची आणि मोबदला द्यायचा कुणाला याची पंचाईत शासनापुढे उभी राहिली आहे.

... तरीही मोबदल्याला फाटा
22 नोव्हेंबर 2013 रोजी रामनाथ आसाराम कोथंबिरे यांना शासनाने जमीन संपादित करण्याची नोटीस बजावली होती. यानुसार भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जमिनीचे मोजमाप झाले. यानुसारही रामनाथ यांच्या नावे साडेसहा एकर जमीन आहे; पण मोबदला यादीत केवळ साडेचार एकर दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात एकाच भावाची जमीन कमी झाली आहे.

तक्रार आणि मोबदला थांबवला
आपली जमीन कमी झाल्याचे लक्षात येताच रामनाथ यांनी भूसंपादन कार्यालयाला तक्रार दिली. तक्रारीची शहनिशा करून कार्यालयाने गट क्रमांक 373 मधील लाभार्थींच्या सुमारे 9 कोटी रुपयांना स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पूर्ण मोजणी करण्याचे आदेश भूमी अभिलेख कार्यालयाला दिले आहेत. मात्र, या सर्व गोंधळामुळे 9 कोटींची रक्कम थांबली आहे.

थेट सवाल - सीताराम राठोड, भूसंपादन विभाग अधिकारी

आपल्याकडे कोथंबिरे यांची तक्रार आली आहे का?
- होय आली आहे. यानुसार पैठण येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.
यात चूक नेमकी कुणाची आहे?
-खरे तर सुरुवातीला पाझर तलावासाठी जमिनीचे भूसंपादन झाले तेव्हाच या प्रकरणाची तक्रार संबंधित शेतक-यांनी करायला हवी होती.
आता प्रकरणाची सद्य:स्थिती काय आहे?
-मागील रेकॉर्ड बघता तक्रारदाराची भूमिका योग्य आहे. कारण भूमी अभिलेख कार्यालयाने दिलेल्या अभिप्रायात नेमकी जमीन कुणाची गेली याबाबत खुलासा नाही. या गटाची पूर्ण तपासणी करून अहवाल आल्यानंतर सर्वांना योग्य मोबदला मिळेल. तोपर्यंत या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. अन्याय कुणावरही होणार नाही.

योग्य मोबदला मिळावा
- वडिलोपार्जित जमीन आहे. सर्वांना जो न्याय मिळेल तो मला हवा आहे. माझ्या सातबाºयावर जितकी जमीन आहे त्यानुसार शासनाने योग्य कार्यवाही करून मला माझा मोबदला द्यावा एवढीच अपेक्षा. - रामनाथ कोथंबिरे, पीडित शेतकरी, बिडकीन