आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात शेतक-यांची दैना, पाण्यासाठी हाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आठ तालुक्यांचा अख्खा जालना जिल्हा दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघाला असून ग्रामीण अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडत आहे. मोसंबीचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या अंबड, घनसावंगी भागात शेतक-यांनी पोटच्या लेकरासारख्या वाढवलेल्या मोसंबीच्या बागा मोडायला सुरुवात केली आहे. पाण्याचे एवढे दुर्भिक्ष आहे की प्यायला मिळाले तरी खूप झाले. दुष्काळाने ग्रामीण जनजीवनात उलथापालथ केली असून रोजगार आणि पाण्यासाठी लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे.


मराठवाड्यात पाण्याची दैना असणारा आठ तालुक्यांचा जालना जिल्हा दुष्काळाच्या कराल जबड्यात अडकला आहे. विंधन विहिरींचे पाणी गायब झाले, विहिरी आटल्या, जलाशय कोरडेठाक पडले. शेती उद्ध्वस्त झाली. रोजगार घटला. आठही तालुक्यांत दुष्काळी स्थिती आहे. 789 ग्रामपंचायती आणि 910 गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. गावोगाव पाणी पुरवताना प्रशासनावरचा ताण वाढत आहे. ‘दिव्य मराठी’च्या चमूने अंबड तालुक्यातील जामखेड आणि परिसरातील दुष्काळाचा आढावा घेतला. दुष्काळ पावलापावलावर माणसांची परीक्षा पाहत असल्याचे जाणवते. अंबड तालुक्यातील जामखेड, कर्जत, सुखापुरी, रोहिलागड ही गावे भीषण दुष्काळाचे चित्र दाखवतात.a


अंबड ते जामखेड : चोहीकडे रखरखाट.
औरंगाबाद : अंबड ते जामखेड मार्गावर चोहीकडे रखरखाट आणि उन्हाळ्याची दाहकता दिसते. काळपट, पिवळी पडून माना टाकलेली पिके जनावरांना खाण्याच्याही लायकीची राहिलेली नाहीत. ज्वारी निदान चा-या साठी उपयोगी पडायची. यंदा तर गुडघाभरही ज्वारी वाढली नाही. त्याचा चा-या लाही उपयोग नाही. किनगावचा ज्ञानेश्वर नन्नावरे खपाटी गेलेली जित्राबे चरण्यासाठी रोज निघतो. आसपासच्या तीन चार किलोमिटर परिसरात त्याला रोज पायपीट करावी लागते. जनावरांना चारा मिळत नाही, प्यायला पाणी नाही. शेतक-या ंना जनावरे सांभाळणेही मुश्कील झाले आहे. कामापुरती एक दोन जनावरे ठेवून बाकीची विकण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही, असे सांगताना तो आणखीच अस्वस्थ झाला.
नावानिशी ड्रम कायम रांगेत!
जामखेड गावात शिरताच पाण्याची प्रतिक्षा करीत आ वासून असलेले निळ्या उघड्या ड्रमचा जथ्था गल्लोगल्ली दिसतो. हे ड्रम कायम तिथेच असतात. प्रत्येक ड्रमवर मालकाचे नाव लिहीले आहे. टँकर आला की ड्रम जमेल तेवढा भरून घ्यायचा, नंतर हंड्याने पाणी घरापर्यंत न्यायचे. 20 हजार लोकवस्तीचे हे गाव. गावालगत 12 वाड्याही आहेत. या सर्वांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. ग्रामपंचायतीने सुरु केलेले 4 टँकर अजिबात पुरत नाहीत. म्हणून खासगी पाणी विक्रीला जोर आला आहे. परिसरात 50 रुपयांना 200 लिटरचा टिप्पा विकला जातो. गावाच्या एका टोकाला पाण्याची टाकी आहे. त्या टाकीत टँकर ओतला की तिथे गर्दीॅ उसळते. शेजारच्याच वस्तीत कोरड्या हापशांतून पाणी उपसायचे बाया बापड्यांचे प्रयत्न दिवसभर सुरु असतात. दहा मिनीटे हापसल्यावर पंपातून गुळणी केल्यासारखे पाणी येते. सुरकुतलेल्या चेह-या ची म्हातारी गयाबाई भोजने म्हणाली, गेल्या वर्षापत्तोर या हापशाला चांगलं पाणी होतं. उगं थोडं हापसलं तरी बदाबदा पाणी यायचं. आता जीव जायची वेळ येते पण पाणी नाही मिळत.

वाळलेल्या मोसंबीच्या बागा तोडून टाकण्याची वेळ
शेतक-या चे तर दुष्काळाने कंबरडेच मोडले आहे. मोसंबी आणि कापूस हे प्रमुख पिक असलेल्या या भागात यंदा शेतीची मातीच झाली. पावसाने दगा दिला, पाण्याने साथ सोडली. पाहता पाहता शेती संकटात आली. लिंबाएवढ्या मोसंबी लागलेल्या बागा सुकल्या आहेत. बहुतेक ठिकाणी दगडासारख्या कठीण झालेल्या या मोसंबी पिक हातचे गेल्याची साक्ष देतात. रत्नाकर मुळे हे गावात पौरोहित्याचे काम करतात आणि सव्वा - दीड एकर शेतीही पाहतात. ते यंदा हतबल झाले आहेत. त्यांची दहा वर्षांपासून असलेली 200 झाडांच्या मोसंबीची बाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. निम्मी बाग साफ झाली आहे. झाडावरची मोसंबी काढून टाकण्याचे काम सुरु आहे. जी झाडे पूर्ण सुकली ती तोडण्याचे अवघड काम त्यांना करावे लागत आहे. पाण्याची सोय व्हावी म्हणून 250 फूट खोल बोअर घेतला. पाण्याचा एक थेंब लागला नाही. 17 हजार रुपये वाया गेले.यंदा लग्नसराई नसल्यासारखीच आहे, त्यामुळे ते उत्पन्न नाही, शेतीत तर सगळेच गेले, असे सांगत माणसाने आता करावे तरी काय असा सवाल रत्नाकर मुळे करतात. त्यांच्या शेजारीच रघुनाथ टेंभरे यांची 7 एकर शेती आहे. मोसंबीची 300 झाडे आहेत. ती पण यंदा तोडावी लागणार आहेत. ते म्हणाले, 1972 पेक्षा हा दुष्काळ भयंकर आहे. तेव्हा निदान प्यायला पाणी होते. धान्य नव्हते. यावेळी तर पाणीच नाही. पोटच्या पोरासारखी जपलेली झाडे तोडताना जीव तुटतो. आशा सुटत नाही आणि सहनही होत नाही.

9 वर्षे बाग सांभाळली पण...
जामखेडचे सरपंच प्रमोद ताडे यांच्याकडेही 850 झाडांची मोसंबीची बाग आहे. तीन विहीरी आहेत, पण एकातही पाणी नाही. नऊ वर्षे ही बाग सांभाळली. आता मोडायची वेळ आली आहे. रान नीट करायचे म्हटले तरी 25 हजारांचा खर्च येणार आहे. आपल्या शेतीच्या संकटासोबत गावच्या पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यात त्यांचा दिवस जातो. टँकर आणणे हेच त्यांच्यासाठी टेन्शनचे काम आहे. गावासाठी 15 किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. इथले पाणी संपले तर कुठून तरी सोय करावीच लागणार आहे. गावालगत लेंडी नदीवर साठवण तळे झाले तर प्रश्न सुटू शकेल. पण सरकार पाणी काढायला पैसे देते पाणी अडवायला देत नाही. गावात रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे तातडीने हाती घ्यायला हवीत असे सांगत ते म्हणाले की, आता आदेश दिले तर कामे होतील. नंतर लोकांची दैन झाल्यावर पैसा येऊन काय उपयोग?

अंबड तालुक्यातील कर्जत गावात जवळपास असेच चित्र आहे. पाण्याची वाट पाहणे हा गावातील महिला, वृद्ध आणि मुलांचा दिनक्रम. रोजगारासाठी अनेकांनी शहराची वाट धरली आहे. येत्या पाच सहा महिन्यात याहून बिकट अवस्था होणार आहे हे जाणून स्थलांतराचे प्रमाण आता वाढू लागले आहे. त्यामुळे गावात म्हातारे आणि महिलांची संख्या जास्त दिसते.