आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषाच्या बाटल्या घेऊन दीडशे शेतकर्‍यांचे आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठण तालुक्यातील नऊ गावांतील दीडशे शेतकरी कृषिपंपांना वीज कनेक्शन मिळण्यासाठी दीड वर्षापासून महावितरणकडे खेटे मारत आहेत. निराश झालेल्या शेतकर्‍यांनी शेवटी मंगळवारी टोकाची भूमिका घेतली. मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या कार्यालयात विषाच्या बाटल्या सोबत नेऊन ‘वीज द्या, नाही तर विष घेऊ’ अशी भूमिका घेतली. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. शिंदे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून सर्वांना वीज देण्याचा प्रस्ताव तत्काळ मंजूर केला.
वाहेगाव, मुधलवाडी, कातपूर, नारायणगाव, चाचलगाव, देयानतपूर, रहाटगाव, वरुडी आणि इसारवाडी या गावांतील दीडशे शेतकर्‍यांनी बँकेचे कर्ज काढून जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाइपलाइन केली. यासाठी एका शेतकर्‍याने सुमारे 15 ते 30 लाख रुपये कर्ज घेतले आहे. पाण्याची सोय झाली मात्र वीज नसल्याने शेतकर्‍यांनी महावितरणकडे अर्ज केले. प्रथम डीडीएफ योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल केला. ट्रान्सफॉर्मर, वाहिन्यासांठीचा सर्व खर्च शेतकरी भरण्यास तयार झाले; पण एवढा खर्च भागवणे शक्य नसल्याने नॉन डीडीएफ योजनेअंतर्गत अर्ज भरला.
40 शेतकर्‍यांनी कोटेशनही भरले. गणेश विसर्जनानंतर वीज कनेक्शन देण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. ते त्यांनी पाळले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी सर्व खर्चाचा विचार करून नॉन डीडीएफ योजनेअंतर्गत अर्ज करून वीज कनेक्शन देण्याची मागणी केली; पण वीज देण्यास महावितरणने विलंब केला. त्यामुळे शेतकर्‍यांनी अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न करूनही त्यांची भेट होऊ शकली नाही. या वेळी टोपे तेथे होते. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना वीज कनेक्शन देण्यास सांगितले. महावितरणच्या प्रतापगड येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठकही झाली. त्यामध्येही नॉन डीडीएफ योजनेअंतर्गत वीज कनेक्शन देण्याचे ठरले. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालीच नाही. त्यामुळे शेतकरी वैतागले आणि त्यांनी 4 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्या कार्यालयात कीटकनाशकाच्या बाटल्या हातात घेऊन ‘वीज कनेक्शन द्या, अथवा आताच आत्महत्या करू,’ अशी टोकाची भूमिका घेतली. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर शिंदेंसह अधीक्षक अभियंता आदिनाथ सोनवणे यांनी बैठक घेऊन सायंकाळी त्यांना वीज कनेक्शन देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तेव्हाच शेतकर्‍यांनी माघार घेतली. या वेळी विष्णू बोडखे, आबासाहेब मोरे, रामेश्वर मोरे, राजेंद्र म्हस्के, दगडू रोडी, प्रदीप म्हस्के, संजय नवले यांच्यासह 50 शेतकरी उपस्थित होते.