आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Suicide Attempt In Kannad District Aurangabad

अनुदानासाठी तहसीलमध्ये शेतकर्‍याने घेतले विष, कन्नड तहसीलमधील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - गतवर्षीच्या दुष्काळात फळबागेचे मोठे नुकसान झाले. पंचनामे करण्यासाठी वर्षभर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवले. परंतु अधिकारी पंचनामा अहवाल तयार करत नव्हते. अखेर या प्रकाराला कंटाळून शेतकर्‍याने सोमवारी कन्नड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदाराच्या दालनातच विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. गंभीर शेतकर्‍यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील शेतकरी जनार्दन कारभारी अकोलकर (48) यांची गट क्रमांक 213 मध्ये एक हेक्टर 55 आर जमीन आहे. त्यांच्या शेतात 70 ते 75 आंब्याची झाडे होती. विकतचे पाणी देऊन ही झाडे जगवली. मात्र, गतवर्षीच्या दुष्काळात फळबागेस फटका बसला.
दुष्काळामुळे फळबागेचे पूर्णत: नुकसान झाले. या नुकसानीचे महसूल कर्मचार्‍यांनी पंचनामे करून भरपाई द्यावी यासाठी अकोलकरांनी मागील वर्षीपासूून तलाठी, कृषी सहायक यांच्यासह तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयात अनेक वेळा चकरा मारल्या. त्यानंतर तलाठी एच. एल. गांगे, कृषी सहायक एस. आर. चौधरी यांनी पंचनामे केले. मात्र, ते दाखल करण्यासाठी हे कर्मचारी अकोलकर यांच्याकडे पैशाची मागणी करत होते. शिवाय 28 नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार नोंदवली होती. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर अकोलकर यांनी सोमवारी दुपारी तहसील कार्यालय गाठून नायब तहसीलदारांच्या दालनासमोर विष प्राशन केले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. अकोलकर यांना शासकीय वाहनातून तत्काळ कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले.
शासकीय अधिकार्‍यांचे उंबरठे झिजवून तक्रार नोंदवूनही दखल न घेता त्यास डावलले गेल्याने शेतकरी अशी पावले उचलत असल्याची चर्चा शहर व तालुकाभर होती.
वरिष्ठांनीही दखल घेतली नाही
नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी वारंवार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे उंबरठे झिजवले. परंतु न्याय मिळाला नाही. खर्‍यांना न्याय मिळत नाही. बोगस लाभार्थींना मदत दिली गेली. तलाठी एच. एल. गांगे, कृषी सहायक एस.आर. चौधरी यांनी पैसे मागितले. माझा पंचनामाच दाखल केला नाही. उलट गांगे यांनी मला शिवीगाळ केली व गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. यासंदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांकडे 28 नोव्हेंबर 2013 रोजी तक्रारही दिली. मात्र, काही एक उपयोग झाला नाही. माझे पाच पत्राचे छप्पर असून पत्नी, दोन मुले व एक अपंग मुलगी आहे. त्यांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न पडला आहे. जनार्दन कारभारी अकोलकर, शेतकरी
जैतापर येथील जनार्दन अकोलकर यांनी विष प्राशन केल्यानंतर स्थानिक रुग्णालयत दाखल करण्यात आले.
गारपिटीची मदत नाही; मतदानावर बहिष्कार
फुलंब्री - तालुक्यातील पिंपळगाव वळण व देवपिंपळगाव येथे फेब्रुवारी महिन्यात मोठय़ा प्रमाणात वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. मात्र, शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत न दिल्याने या गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, महसूल, जिल्हाधिकारी व तहसीलदारास निवेदन पाठवले आहे. या वर्षी मोठय़ा प्रमाणात वादळी वारा व गारपीट झाली आहे. या गारपिटीने शेतकर्‍यांच्या पिकांचे 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने या गावातील शेतकर्‍यांना कसलीच मदत न केल्यामुळे या गावातील शेतकर्‍यांनी शासनाच्या निषेध केला असून येणार्‍या लोकसभा निवडणुकीत सहभाग न घेता मतदानावर बहिष्कार घालण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. राहुल गांधी हे फुलंब्री तालुक्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांनी या गावाला भेट दिली होती. त्या वेळी गावकर्‍यांनी प्रशासनाच्या विरोधात गंभीर तक्रारी केल्या होत्या.