आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीने पिके भुईसपाट; होळीच्या सणावर सावट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा, जि. नाशिक - गारपिटीमुळे डाळिंब व हरभर्‍याच्या पिकाचे नुकसान झाल्याचे पाहून बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे आत्माराम सीताराम पवार (42) यांनी होळीच्या दिवशीच रविवारी पहाटे शेतात विष घेऊन आत्महत्या केली. पवार यांनी 7 एकरात विकत पाणी व उसने पैसे घेऊन पीक घेतले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत.

शिवना, धोत्रा, गोळेगाव परिसरात निरुत्साह
शिवना (जि. औरंगाबाद) - गारपीट, अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावून घेतल्याच्या धक्क्यातून शेतकरी अजूनही सावरलेले नाहीत. होळीच्या सणावरही या अस्मानी संकटाचे सावट दिसून आले.

सिल्लोड तालुक्यात शिवना, धोत्रा, गोळेगाव भागाला पावसाने सलग 19 दिवस झोडपले. 8 मार्च रोजी वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीने पिके नेस्तनाबूत केली. होळीनिमित्त गावात येऊन होळीगीत गाणारे बंजारा बांधवही यंदा फिरकले नाहीत.

नवे धान्य गारांना सर्मपित - होळी सणाच्या काळात गव्हाचे पीक जोरदार येते. त्यामुळे होळीच्या दुसर्‍या दिवशी होळीच्याच अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची जुनी प्रथा आहे. नवीन पिके अग्निदेवतेला सर्मपित करण्याच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेला यंदा अवकाळी पावसामुळे अडथळा निर्माण झाला आहे.