आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Suicide News In Marathi, Marathwada, Divya Marathi

मराठवाड्यात ८ महिन्यांत २८० शेतक-यांच्या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील २८० शेतक-यांनी ८ महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत. ८ जिल्ह्यांत दररोज एकापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून कमी उत्पन्न आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे कर्जबाजारी झाल्याने शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मराठवाड्यात १ जानेवारी २०१४ ते २२ ऑगस्ट २०१४ या कालावधीत २८० शेतक-यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती विभागीय कार्यालयाच्या नोंदीतून समोर आली आहे. २०१२ मध्ये दुष्काळ पडला होता. त्यामध्ये खरीप, रब्बी पिकांबरोबरच फळबागा उद्ध्वस्त झाल्या. या संकटातून शेतकरी कसाबसा उभा राहिला. २०१३ मध्ये समाधानकारक पाऊस झाला. दुष्काळाच्या झळा पुसल्या गेल्या. खरिपाची विक्रमी पेरणी झाली. उत्पादनही चांगले आले. रब्बीची पेरणीही विक्रमी झाली, पण पीक हातातोंडाशी आले आणि रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, फळबागांवर गारपीट झाली. या वर्षी तरी चांगला पाऊस पडेल, या आशेवर खरिपाची तयारी केली. कर्ज काढून ४३ लाख ९४ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी केली, पण निसर्गाने यंदाही दगा दिला आहे. यामुळे २० टक्के सिंचन क्षेत्र वगळता ८० टक्के कोरडवाहू शेती व शेतकरी संकटात सापडले आहेत.

हवामान बदलाचे दुष्परिणाम: हवामान बदलाचे दुष्परणिाम समाजाला भोगावे लागत आहेत. पावसाचे दिवस कमी झाले आहेत. शेतकरी नफ्याची शेती करू लागला आहे. यामुळे धोके जास्त वाढले आहेत. मात्र, आत्महत्या हा काही मार्ग नाही. शेतकऱ्यांनी एकमेकांच्या दु:खात सहभागी होऊन मदत केली, तर ही समस्या सोडवता येऊ शकते. कृषी विभाग योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे.
जनार्दन जाधव, कृषी सहसंचालक
.
पंतप्रधानांना पत्र
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून विशेष नधिीची तरतूद करण्यात यावी, यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यामध्ये सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे नमूद करून दुष्काळाचे गांभीर्य पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्याची वनिंती केली आहे.

जिल्हानिहाय आत्महत्या
औरंगाबाद ३२
जालना १४
परभणी २१
हिंगोली १६
नांदेड ५६
बीड ८०
लातूर २४
उस्मानाबाद ३७
एकूण - २८०

आत्महत्या करणारे काही २२ ते ३५ वयोगटातील
शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी शेतसारा, शालेय शिक्षण फी आणि वीज बिलात ३३ टक्के माफी दिली आहे. शेतकऱ्यांकडे पाणीच नाही. वीज बिल माफी काय कामाची. शासनाचे उदासीन धोरणच शेतकरी आत्महत्येला जबाबदार आहे. आत्महत्या करणारे सर्वात जास्त शेतकरी २२ ते ३५ या वयोगटातील आहेत.
जयाजी सूर्यवंशी, शेतकरी.

१० गावांना भेटी दिल्या
* उत्पादन खर्च कमी होणे, कौटुंबिक वाद, सततचे नैसर्गिक संकटे, नैराश्य आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे दहा गावांना भेटी दिल्या त्यावेळी केलेल्या निरीक्षणातून लक्षात आले. मात्र आत्महत्या हा काही मार्ग नाही. शेतकऱ्यांनी एकमेकांच्या दु:खात सहभागी होऊन एकमेकांना मदत केली तर ही समस्या सोडवता येऊ शकते. कृषी विभागाच्या वतीने योग्य ते सहकार्य केले जात आहे.
जनार्दन जाधव, कृषी सहसंचालक.

शासनाने मदत करणे आवश्यक
* कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबरच पशुधनाचे पोट कसे भरावे, असा प्रश्न सध्या बळीराजासमोर उभा आहे. दैनंदनि खर्चाचे संकट त्याला भेडसावत असल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. यासाठी शासनाने मदत करणे आवश्यक आहे.
त्र्यंबक पाथ्रीकर, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी.