आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेचे कर्ज न घेतल्याने मृत शेतकरी ठरले बेवारस मजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- 2009 मध्ये पिके चांगली झाली नाहीत. त्यातून तो सावरत असतानाच 2012-13 मध्ये भीषण दुष्काळात तो पुन्हा खचला. मात्र, गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने त्याच्या आशा पल्लवित झाल्या. सावकाराचे कर्ज फिटेल, चैनीचे दोन घास पोटात जातील, असे त्याला वाटू लागले. खरिपाबरोबरच रब्बीची पिकेही बहरल्याने सुटलो एकदाचे दुष्टचक्रातून, ही त्याची अपेक्षा गारपिटीने अवघ्या काही मिनिटांतच फोल ठरली. तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत नाहीसा झाल्याने तो प्रचंड खचला. यातून बाहेर पडण्याचा रस्ताच न दिसल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील चौघांनी मृत्यूला कवटाळले; पण त्यातील तिघांकडे बँक किंवा सोसायटीचे कर्ज नसल्यामुळे मदत मिळणार नाही, असे यंत्रणेने स्पष्ट करून जगाचा पोशिंदा म्हणवल्या जाणार्‍या बळीराजाची क्रूर चेष्टा केली.
एकाला शेतमजूर ठरवण्यात आले. दुसर्‍यावर म्हणे कर्ज नव्हते, तिसराही शेतमजूरच ठरला. चौथा तेवढा नशीबवान ठरला. त्याच्या कुटुंबीयांना किमान 1 लाख रुपये मिळतील, कर्जमुक्तीही होईल. तो जिवंतपणी जे करू शकला नाही, ते किमान त्याच्या मृत्यूने तरी होईल. काही महिन्यांसाठी सातबारा कोरा दिसेल, पण अन्य चौघे जे गेले, त्यांचे काहीच नाही. त्यांच्या उत्तरकार्यासाठी पुन्हा कर्ज काढण्याची वेळ घरच्यांवर येईल आणि कर्जाच्या ओझ्याखाली पुढची पिढी आपोआपच दबली जाईल. कर्जाच्या दुष्टचक्राचा असा वारसा आपोआपच त्यांच्याकडे येईल.
खासगी सावकारीच तेजीत
मृत्यूनंतर 1 लाखाच्या शासन मदतीसाठी पात्र असावे, यासाठी शासनाचा पहिला निकष आहे तो म्हणजे बँक किंवा गावातील सोसायटीचे कर्ज असणे. प्रत्यक्षात ग्रामीण भागात आजही राष्ट्रीयीकृत बँका शेतकर्‍यांना उभे करत नाहीत, सोसायटी कोणाला मिळेल, हे सांगता येत नाही. कागदपत्रांची पूर्तता करण्यात प्रचंड वेळ जातो, अशा वेळी शेतकर्‍यांसमोर एकमेव पर्याय असतो तो म्हणजे खासगी सावकाराचा दरवाजा ठोठावणे. सावकाराकडे कधी जमीन गहाण ठेवली जाते, असेल तर अंगावरील किडूक, मिडूक, सावकार पुढे करेल त्या कागदावर अंगठा ठेवला की लगेच कर्ज. त्यामुळे सावकारी तेजीत राहते. सावकाराचे हे कर्ज बेकायदा असल्याची त्यालाही जाणीव असते; परंतु दिलेला शब्द पाळणारा हा शेतकरी कधीच कर्ज बुडवण्याचा विचार मनात आणत नाही, त्यामुळेच त्याच्या मनात थेट आत्महत्येचे विचार येतात.
मृत शेतकर्‍यांची नावे-पात्र-अपात्रतेची कारणे
दिगंबर गंगाधर राऊत (वय 60, कोंदर, पैठण)- शेतकरी तसेच कर्ज घेतल्याचे पुरावे आल्यामुळे 1 लाख रुपये शासकीय मदतीस नातेवाईक ठरले पात्र
दत्तू नारायण शेवाळे (बोरसर, वैजापूर)- शेतकरी असले तरी कर्ज असल्याचा पुरावा नाही.
शिवाजी हरिश्चंद्र गायकवाड (वय 45, रा. वाडी चिमणापूर, ता. कन्नड)- शेतकरी नव्हे, तर शेतमजूर आहे. कर्ज असल्याचा पुरावा नाही.
लक्ष्मण एकनाथ फुले (वय 53, रा. विहामांडवा, पैठण), शेतमजूर, कर्ज असल्याचा पुरावा नातेवाईक सादर करू शकले नाही.
गारपिटीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची शासनाकडे बेवारस मजूर म्हणून नोंद