आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने डोळे वटारले; 44 प्रकल्प कोरडेठाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील वर्षी दुष्काळातून पोळून निघालेल्या जनतेसाठी यंदा जून महिन्यात पडलेला पाऊस दिलासा देणारा ठरला. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने जिल्ह्यातील एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही. परिणामी येणार्‍या दिवसांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. 44 प्रकल्प कोरडेठाक असून, सोळा प्रकल्पातील पाणी जोत्याखालीच आहे. पावसाने डोळे वटारल्याने पिकांची वाढही खुंटली आहे.
दुष्काळाचे चटके बसलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षीही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे एकाही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. जून-जुलैमध्ये झालेल्या रिमझिम पावसामुळे पाण्याची आकडेवारी वाढली. मात्र, कोरड्या पडलेल्या प्रकल्पात पाणी साचलेच नाही. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस झाला नाही तर पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील 16 मध्यम प्रकल्पांत 12.37 टक्के, तर 90 लघु प्रकल्पांत फक्त 28 टक्के पाणीसाठा आहे. अद्याप 44 प्रकल्प कोरडेठाक असून तर 16 प्रकल्प जोत्याखाली आहेत. जिल्ह्यातील 106 प्रकल्पांची साठवण क्षमता 443 दलघमी असताना फक्त 77 दलघमी पाणीसाठा झाला आहे.
पिकांच्या वाढीवर होणार परिणाम
ऑगस्ट महिन्यात केवळ तीन ते चार दिवसच पाऊस झाला. त्यामुळे कापूस, तूर आदी पिकांची वाढ खुंटली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीत पाऊस दिसत असला तरी पिकांच्या वाढीसाठी लागणारा पाऊस झाला नाही. त्यामुळे आगामी काळात पाऊस नाही झाला तर रब्बीच्या पिकांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे मत आत्मा प्रकल्पाचे संचालक एस.शिरडकर यांनी व्यक्त केले.
हे प्रकल्प कोरडे
सुखना, लाहुकी, नारंगी, गौताळा, सातकुंड, बोरदहेगाव, अंजनडोह, केसापुरी, गोलटगाव, तिसगाव, डोंगरगाव, कोलठाण, जडगाव, जातेगाव, बाभूळगाव, संजूळ, गिरसावळी, आळंद, रांजणगाव, धामोरी, सटाणा, भिलवणी यांसारखे 44 प्रकल्प कोरडे पडले आहेत