आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

14 लाखांचा धनादेश धूळखात, मोबदल्याच्या प्रतीक्षेत शेतकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील शिल्लेगावातील लघु प्रकल्पाच्या पाटात वजनापूर आणि बुट्टेवाडगाव येथील 130 शेतकर्‍यांच्या जमिनीचे सात वर्षांपूर्वी भूसंपादन केले होते. जमिनीचा मावेजा अद्यापपर्यंत मिळाला नसल्याने शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाला 5 जून रोजी टाळे ठोकण्याचा पवित्रा घेतला आहे. दोन वर्षांपासून आलेला पहिल्या टप्प्यातील 14 लाखांचा निधी शेतकर्‍यांना वितरित करण्यात आलेला नाही.
लघु प्रकल्पात गेलेल्या कोरडवाहू जमिनीला 1 हजार प्रतिगुंठा तर बागायती जमिनीला 2 हजार रुपये देण्यात येणार होते. यासंबंधी शेतकर्‍यांनी वारंवार प्रशासनाकडे संपादित जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मात्र पुढील महिन्यात काम होईल, अशी आश्वासने अधिकारी देत आहेत. याविषयी शेतकर्‍यांनी जि. प. सदस्य संतोष जाधव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता, अधिकार्‍यांनी कोणत्याही प्रकारे सहकार्य करण्यास नकार दिला. यामुळे शेतकर्‍यांनी थेट भूसंपादन कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होत असून शासन याची दखल घेत नसल्याने टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले.
अधिकार्‍यांची टोलवाटोलवी
याबाबत उपजिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी आर. एस. बावीस्कर यांच्याशी संपर्क साधला असता, भूसंपादन विभागाचा कार्यभार मी नुकताच घेतला आहे. त्यामुळे या विषयी जास्त माहिती नाही. माझ्याअगोदर रिता मैत्रवार होत्या त्यांना विचारा. मैत्रवार यांच्याशी संपर्क साधला असता या विभागाचे मी एकच महिना काम पाहिले. त्यामुळे मला काही माहीत नाही.
> पाट तयार केला, त्याचा फायदाही होतो. मात्र मोबदला न मिळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जमिनी केव्हा मोजल्या त्याचा काय मोबदला आहे. याबाबत कोणतीच माहिती प्रशासनाने दिली नाही. उलट कार्यालयाच्या बाहेरचा रस्ता दाखविला. ज्ञानेश्वर तिवाडे, सरपंच, बुट्टेवाडगाव
>प्रशासनाला आमच्या जमिनीचा मोबदला मिळाला असूनही त्यांचे वितरण अद्यापही करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. - राजेंद्र चव्हाण, शेतकरी, वजनापूर
>7 वर्षांपासून जमिनीचा मोबदला मिळेल. या अपेक्षेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. शेतीचा मोबदला व्याजासह मिळावा. - बाळासाहेब चव्हाण, वजनापूर