आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीचा विजय; उन्हात कापूस वेचणाऱ्या इंदुबाई सांभाळणार पं.स. सभापतिपदाची खुर्ची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयानंतरही कापूस वेचणीची लगबग - Divya Marathi
विजयानंतरही कापूस वेचणीची लगबग
शिऊर- नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत शिऊर गणातून इंदुबाई जालिंदर सोनवणे यांनी घवघवीत यश संपादन करत पंचायत समितीच्या सभापतिपदावर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. मोलमजुरी करणाऱ्या आणि उपेक्षित घटकातील त्या एकमेव विजयी उमेदवार ठरल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीत इंदुबाईंनी सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 
 
घरात अठराविश्व दारिद्र्य असलेल्या जमीन बटाईने कसण्यास धरून त्यात वर्षानुवर्षे कष्ट करून घरगाडा चालवण्यासाठी पतीला मदत करणाऱ्या शिऊर येथील शेतमजूर महिलेने वैजापूर पंचायत समितीच्या कारभाराची सूत्रे अडीच वर्षांकरिता हाती ठेवण्याची नामी संधी जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर नुकतीच मिळवली आहे. दीड दोन महिन्यांपूर्वी राजकारणाचा गंधही नसणाऱ्या आणि दोन वेळच्या भाकरीसाठी दिवस-रात्र बटाईने धरलेल्या शेतात कबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेवटच्या घटकातील इंदुबाई सोनवणे या ग्रामीण महिलेची लोकशाहीने केलेली स्वप्नपूर्ती चर्चेचा विषय ठरत आहे. 

राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या इंदुबाईंच्या विवाहानंतरचे आयुष्य पती जालिंदर सोनवणे यांच्यासोबत शेतातील खुरपणी, वेचणी, निंदणी, सोंगणी याच कामात व्यतीत होत आहे. नशिबी राजयोग असल्याचा विचार देखील त्यांच्या ध्यानी मनी नसावा. मात्र, असा योग जानेवारी महिन्यात भारतीय जनता पार्टीने त्यांच्यासाठी जुळवून आणला. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शिऊर गण आरक्षित झाल्याने बऱ्याच उमेदवारांच्या चाचपणीनंतर आमदार प्रशांत बंब, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आणि माजी जि.प.सदस्य सुनील पैठणपगारे यांनी इंदुबाई सोनवणे यांना उमेदवारी देऊ केली, परंतु आमच्याकडे मतदारांना चहा पाजण्यासाठी देखील पैसे नसल्याचे इंदुबाईंनी स्पष्ट सांगितले. 

अशा स्थितीत विजयाचे दावेदार इंदुबाईच असल्याची जाणीव सुनील पैठणपगारे आणि पदाधिकाऱ्यांना झाली असल्यागत प्रचाराची सर्व जबाबदारी उचलून निवडणुकीच्या रणांगणात इंदुबाईंना उतरवण्याचे ठरवले आणि प्रचाराचा धुराळा उडवत पक्षाच्या बळावर आणि पतीच्या पाठिंब्यावर त्या विजयी देखील झाल्या. भाजपने एक गरीब कुटुंबातील महिलेला दुसऱ्या महत्त्वाच्या पदावर बसण्याचा योग लोकशाहीच्या माध्यमातून घडवून आणल्याची भावना मतदार व्यक्त करत आहेत. 
 

महिलांना मुख्य प्रवाहात आणणार 
सभापती झाल्यानंतर कोणत्या कामांना प्राधान्य देणार याविषयी विचारले असता निराधार महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय अनेक पात्र वृद्ध महिलांना अजूनही श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी लाभ देण्यास प्रयत्न करून वंचितांना घरकुल, रेशन कार्ड देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे इंदुबाईंनी सांगितले. 

इंदुबाई सोनवणे तब्बल ८८२ मतांची आघाडी घेत विजयी होऊन पंचायत समितीच्या सदस्य झाल्या आहेत. १४ मार्च रोजी त्या सभापती होणार असल्या तरी इंदुबाई आजही रणरणत्या उन्हात सुना, मुलांसह कापूस वेचणी करतात. दोन शेतकऱ्यांची मिळून एकूण ११ एकर क्षेत्र बटाईने कसतात. सोमवारी प्रतिनिधी त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेले असता इंदुबाई नेहमीप्रमाणे कापूस वेचत होत्या. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...