आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप पेरणीतून यंदा मूग, उडीद, ज्वारी, भुईमूग बाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गतवर्षी 4 जुलैपर्यंत औरंगाबाद विभागात 191.51 मिमी पाऊस झाला होता. मान्सून वेळेवर दाखल झाल्याने खरिपाची पेरणीही उरकली होती. यंदा मान्सूनचा मोसम सुरू होऊन महिना उलटला, पण अद्याप पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून पाऊस लांबल्याने या वर्षी प्रथमच मूग, उडीद, ज्वारी आणि भुईमुगाच्या पेरणीची वेळ निघून गेल्याने शेतकर्‍यांना ही चार पिके आता घेता येणार नाहीत. त्याऐवजी सोयाबीन, तूर, कापूस आणि मका, कोथिंबीर ही पिके घ्यावी लागणार आहेत.

मराठवाड्यात साधारणत: 7 ते 21 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होते. 15 जुलैपर्यंत खरीप पेरणी पूर्ण होते. पण या वर्षी मान्सूनने दगा दिल्याने संपूर्ण खरीप पेरणी धोक्यात आली आहे. मूग, उडीद, ज्वारी आणि भुईमुगाचे पीक यंदाच्या पेरणीतून बाद झाले आहे. याचे उत्पादन या वर्षी शून्य राहील. 15 जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. कापूस, तूर, सूर्यफूल, मका, कोथिंबीर या पिकांची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येऊ शकते. पण येथून पुढे जसजसा पेरणीला उशीर होत जाईल तसतसा उत्पादनावर त्याचा परिणाम होत जाणार आहे.

शेतकर्‍यांनी ही पिके घ्यावीत
15 जुलैपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तर सोयाबीनची पेरणी करावी. त्यासोबत आंतरपीक म्हणून तूर, कपाशी, बाजरीचे पीक घ्यावे. जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये, अन्यथा बियाणे मिळणार नाही. खतांचा वापर कमी करावा. चार्‍यासाठी शेतकर्‍यांना पर्यायी मका, बाजरी पिकाची पेरणी करावी. यासाठी कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. ढवण व औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक जनार्दन जाधव यांनी दिली.

चार पिके बाद झाल्याने होणारे परिणाम
खरीप ज्वारीची पेरणी होणार नसल्याने बियाण्यांसाठी शेतकर्‍यांनी केलेला खर्च वाया जाणार, धान्य व गुरांसाठी चारा मिळणार नाही. बाजारात ज्वारीची आवक कमी आणि मागणी जास्त होऊन भाव वाढतील. मूग व उडदाची डाळ आणि शेंगदाण्याचे भाव गगनाला पोहोचतील. सर्वसामान्यांना या डाळी, शेंगदाणे खरेदी करणे परवडणार नाही. परराज्यातून ग्राहकांची निकड दूर करावी लागेल. पाऊस लांबल्याने कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन बियाणे जास्त प्रमाणात पेरावे व लागवड करावी लागणार आहे. त्यामुळे खर्चात वाढ होईल. उशीर होणार असल्याने उत्पादनात मोठी घट येणार आहे.