आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांनो, नैसर्गिक संकटात जोमाने करा शेती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सततचा दुष्काळ, गारपीट किंवा अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होते. हे दुष्टचक्र रोखण्यासह शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्यात हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने मराठवाडा आणि विदर्भातील चार हजार दुष्काळग्रस्त गावात राबवला जाणारा हा प्रकल्प बळीराजाला नैसर्गिक संकटात शेती करण्याचे तंत्र शिकवेल. तसेच हवामान बदलांचा अभ्यासही करेल.

विकासदरावर परिणाम : हवामान बदलाचे परिणाम कृषी क्षेत्रातही जाणवत आहेत. राज्यातील काही भागांत अतिवृष्टी होते तर काही भागांत कोरड्या दुष्काळाचे चटके बसतात. गेल्या काही वर्षांत गारपिटीच्या माऱ्यानेही शेतीचे प्रचंड नुकसान होत असून अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्याही वाढत आहेत.

दुष्काळ, गारपीट, पाणीटंचाई आणि अतिवृष्टी ही कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने असून यामुळे कृषी विकासाचा दर लक्षणीयरीत्या घटू शकतो, हे शासनाच्या लक्षात अाले आहे. एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना बळ देण्यासह नैसर्गिक संकटांना सामोरे जाण्यासाठी हवामान अनुकूल कृषी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी दिली आहे.

जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य : या अंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील चार हजार दुष्काळग्रस्त गावांत तर विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील सुमारे ९०० गावांत हे प्रकल्प राबवले जातील. यासाठी जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. हवामान बदलाचा शेतीवर पडणारा प्रभाव, त्यावरील उपाययोजना यांचा अभ्यास, संशोधन करून शेती व्यवसायातील अनिश्चितता दूर करण्यासाठी हे प्रकल्प कार्य करतील.

प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबईत
याप्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल, कृती आराखडा आणि कार्यप्रणाली पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईत खास प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन होणार असून यासाठी २३ पदांची निर्मिती करण्यात आली आहे, तर या प्रकल्पासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...