आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळावर गटशेतीच्या मात्रेने १९ गावांचा झाला कायापालट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील चार ते पाच वर्षांपासून दुष्काळामुळे अख्खा मराठवाडा होरपळून निघत असताना जालना जिल्ह्यातील १९०० शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून १९ गावांचा कायापालट केला आहे. "अॅग्रो इंडिया' गटशेती संघाअंतर्गत त्यांनी कमी खर्चात उत्पादनात चार पटीने वाढ करत गावागावात बरकत आणली.

२००७ मध्ये एकरी ७ क्विंटल कपाशीचे उत्पादन होत असताना गटशेतीमुळे ऐन दुष्काळातही हे उत्पादन एकरी २२ ते २५ क्विंटलपर्यंत नेण्याची किमया घडली. देळेगव्हाण येथील फलोत्पादन तज्ज्ञ डॉ. भगवान कापसे, उत्तमराव कापसे, हिंमतराव बनकर आणि विठ्ठलराव पाचरणे या चौघांनी सर्वप्रथम १९८७ मध्ये सामूहिक शेती केली. त्यांचा डाळिंबाचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर जवळपासचे शेतकरी त्यांच्यासोबत जोडल्या गेले. १३ वर्षांनी म्हणजेच ऑक्टोबर २००० मध्ये जिरडगावमध्ये केशर आंबा लागवडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इंडिगो फलोत्पादक संघांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गटशेतीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन २००५ मध्ये इंडिगोचे नामकरण करून अॅग्रो इंडिया गटशेती संघ अस्तित्वात आला. तेव्हापासून या गटाने कधी मागे वळून पाहिले नाही. शेती मशागत, पेरणी, लागवड, काढणीसाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर, एकात्मिक पीक पद्धती, पिकांच्या गरजेपुरताच पाण्याचा वापर, बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेतमालाचे विक्री व्यवस्थापन या गटातर्फे केले जाते. शेतीला विविध जोड व्यवसायही केले जात असल्याने सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त केल्याचे डॉ. कापसे यांनी सांगितले.

असे होते पिकांचे नियोजन

तीन हजार ५०० हेक्टर शेतीक्षेत्रावर कपाशी, तूर, सोयाबीन, मोसंबी, डाळिंब, अद्रक, लसूण, कांदा बीज उत्पादन, रेशीम शेती, गहू आदी पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. २००७ मध्ये एकरी ७ क्विंटल कपाशीचे उत्पादन होत असे आज चार पटीने त्यात वाढ झाली. सध्या एकरी २१ ते २५ क्विंटल कपाशीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. फळ बागातूनही विक्री उत्पादन घेतले जात आहे. इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन संघातील शेतकरी लक्ष्मण सवडे, भाऊराव दरेकर, भगवान कापसे, बालू कापसे, सोमनाथ नागवे, सारंगधर गिरी, रतन पवार, अशोक कदम, राजू घोडके, वैजनाथ फुके, किसनराव कोरडे या शेतकऱ्यांनी सांगितले.

जूनपर्यंत ४० गावांचा होणार समावेश

डॉ. एस. एस. बैनाडे, डॉ. एस. बी. पवार, आर. बी. घोटे या कृषी तज्ज्ञांचा गटशेती संघ स्थापनेत सिंहाचा वाटा आहे. कृषी विभाग, जिल्हा परिषदेमार्फत दुभत्या गायी, म्हशी मिळाल्या. पोल्ट्री, गोट फार्म उभारण्यात आला. शेडनेट, विहिरी या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळाला व खासदार रावसाहेब दानवे यांच्या सहकार्याने गटशेती संघाने सातत्याने यश मिळवत आहे. जूनपर्यंत संघात ४० गावांचा समावेश करण्याचे उद्दिष्टे ठेवली. त्यात अकोला, बुलडाणा, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यातील गावांचा समावेश होणार आहे. १०० हेक्टरवर शेडनेट वाढवण्याचाही निर्णय संघाने घेतला आहे.

कायापालट झालेली गावे
गटशेतीने कायापालट झालेली गावे- अकोला देव, देळेगव्हाण, खामखेडा नागवे, डोणगाव, लिंबखेडा, नांदखेडा, वरूड बु., नळ विहिरा, जवखेडा ठेंग, दगडवाडी (ता. भोकरदन), दगडवाडी (ता. बदनापूर), उंबरखेडा, दाभाडी चिखली, शिवनी आरमाळ, धनगर पिंप्री, हस्तपोखरी टेंभूर्णी, डोंगरगाव, गिरोली म्हस्के.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
पीक घेताना पाण्याच्या स्राेतांचा आवश्यक तेवढाच वापर केला जातो. गटशेती केल्या जाणाऱ्या क्षेत्रावर १६०० विहिरी, २०० शेततळी, जीवरेखा प्रकल्प, खडकपूर्णा प्रकल्प आहे. विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन केले आहे. याची दखल घेत आंतरराष्ट्रीय सिंचन आणि जलनिस्सारण आयोग या जागतिक संघटनेने १२ ऑक्टोबर २०१५ रोजी "वॉटर सेव्ह' पुरस्काराने फ्रान्स येथे डॉ. कापसे आणि आर. बी. घोटे यांना सन्मानित करण्यात आले.

जोडधंद्यातूनही फायदा
२० हेक्टरवर ९० शेतकरी शेडनेट शेती करतात. तीन पोल्ट्री फार्म, दोन गोट फार्म हाऊस आहेत. मॉडर्न दूध डेअरी आहे. म्हणजेच शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी, कोंबडी, पशुधनाचे येथे पालन केले जाते. महिला गृह कामाबरोबरच शेतातील कामकाजातही हिरिरीने सहभागी होतात. डाळ, तिखट, लोणचे, दुग्ध पदार्थ आदी घरगुती प्रक्रिया उद्योग करताता. प्रत्येक द्वादशीला गटातील शेतकरी एकत्र येऊन द्वादशीला ईश्वराचे नामस्मरणाने स्नेहभोजन करतात.