आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांचा रोष वाढला, रोहित्रे काढल्यास कालव्यात उड्या घेऊ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाव्या कालव्यावर बांधावरून उड्या टाकून जीव देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी देताच कारवाई थांबवण्यात आली. छाया : रमेश शेळके - Divya Marathi
डाव्या कालव्यावर बांधावरून उड्या टाकून जीव देण्याचा इशारा शेतकऱ्यांनी देताच कारवाई थांबवण्यात आली. छाया : रमेश शेळके
पैठण - जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर हजाराहून अधिक कृषिपंप सुरू आहेत. या सर्व कृषिपंपांवरील रोहित्रे काढण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी केलेली कारवाई शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे नमते घेत पुढे ढकलावी लागल्याचा प्रकार घडला. रोहित्रे काढण्यासाठी प्रशासनाचे वाहन डाव्या कालव्यावर येताच आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहनाची हवा काढून घेतल्याने एकच गोंधळ उडाला. महावितरणचे अधिकारी भूमिकेवर ठाम राहिल्याने शेतकऱ्यांनी रोहित्रे काढल्यास कालव्यात उड्या घेऊन जीव देण्याचा इशारा दिल्याने प्रकरण चांगलेच चिघळले होते, परंतु प्रशासनाने समयसूचकता बाळगत प्रकरण अधिक चिघळू नये
म्हणून कारवाई केली नाही. आता ही कारवाई शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

मराठवाड्यातील सहा बंधाऱ्यांना पाणी सोडणे सुरूच आहे, परिसरातील चार महिन्यांपूर्वीच या मोटारीचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते, तरीही धरणाच्या उजव्या कालव्यातून दोन हजारांवर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पाणी उपसा करत होते. त्याचप्रमाणे काही शेतकरी डाव्या कालव्यातूनही पाणी उपसा करत असल्याची बाब समोर आल्याने दोन दिवसांपूर्वीच या दोन्ही कालव्यांवरील सर्व मोटारी काढण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने महावितरण कंपनी, स्थानिक पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार गुरुवारी दुपारी १२ च्या दरम्यान पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुहास भावठाणकर, शाखा अभियंता अशोक चव्हाण, महावितरणचे महादेव मोरताळे, सपोनि राजेंद्र शिंदे यांचे पथक धरणाच्या डाव्या कालव्यावरील रोहित्र काढण्यासाठी आले. मात्र, पाचशेवर शेतकऱ्यांनी मोटारी काढण्यास जोरदार विरोध केला. त्यामुळे कारवाई टळली.
लाखोंची रोहित्रे का काढता? संतप्त सवाल
पाटबंधारे विभागाने डाव्या कालव्यातील सर्व कृषिपंपांच्या मोटारीसह रोहित्रे काढण्याचे नियोजन केले होते. चार ते पाच लाख रुपये खर्च करून बसवलेली रोहित्रे का काढता, लाइट बंद ठेवा, असे शेतकरी अधिकाऱ्यांना सांगत होते. मात्र, रोहित्रे काढण्याचे आदेश असल्याने आम्ही काढणारच यावर महावितरणचे अधिकारी ठाम राहिल्याने अधिकाऱ्यांना घेराव घालत रोहित्रे काढू देणार नाहीत यावर शेतकरी ठाम राहिले.
संतप्त शेतकऱ्यांचा आज मोर्चा
डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज काढून पाइपलाइन केल्या. आता दुष्काळातच त्यांच्या मोटारी काढल्या जात असल्याने कर्ज कसे फेडावे, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. शुक्रवारी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती अण्णाभाऊ लबडे, संतोष मगरे, प्रकाश लबडे, आबा मोरे, शिवाजी रोडे, प्रल्हाद गलधर यांनी दिली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, पश्चिम महाराष्ट्राला अभय... पुढील सूचनेनंतर कारवाई
बातम्या आणखी आहेत...