आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 1,053 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वर्षभरात जूननंतर 485

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या वर्षी २०१६ मध्ये तब्बल १०५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढल्या आहेत.
 
यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २२२, तर नांदेड जिल्ह्यात १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे जानेवारी ते जूनदरम्यान ५६८ तर जूननंतरच्या सहा महिन्यांतही तब्बल ४८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 
 
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा कायम चिंतेचा विषय राहिला आहे. २०१५ मध्ये मराठवाड्यात ११३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामध्ये काहीशी घट होऊन २०१६ मध्ये हा आकडा १०५३ पर्यंत घसरला आहे. 
 
या वर्षी एप्रिल महिन्यात १०२ आणि मे महिन्यात सर्वाधिक १०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे सातत्याने झालेले नुकसान यामुळे आत्महत्याचे सत्र डिसेंबर महिन्यातही कायम होते. डिसेंबर महिन्यातही मराठवाड्यात ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 
 
सततच्या दुष्काळाचा बसला फटका 
गेल्यातीन वर्षांपासून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखीच परिस्थिती होती. अपुरे पर्जन्यमान आणि खरीप, रब्बी पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले.
 
यंदा जून महिन्यात झालेल्या पावसामुळे खरिपाच्या मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या. मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले. पेरण्यांसाठी झालेला खर्च, शेतीसाठी काढलेले कर्ज, सावकारी पाशामुळे त्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणात वाढ झाली आहे. 
 
नांदेड, बीडमध्ये सर्वाधिक प्रकरणे 
दुष्काळात सर्वाधिक होरपळणाऱ्या बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात आत्महत्यांची सर्वाधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१६ मध्ये बीड जिल्ह्यात २२२, नांदेड १८० तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर औरंगाबाद जिल्ह्यात १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून जालना ७६, परभणी ९८, हिंगोली ४९, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. १०५३ आत्महत्यामध्ये ७०४ शेतकऱ्यांना मदत मिळाली. ७० प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, तर २७९ जणांना अपात्र ठरवण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...