आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers Take Control Of Their Land In Shendra MIDC SEZ

सेझच्या जमिनीवर शेतकर्‍यांचा कब्जा, मेधा पाटकर यांच्‍या उपस्थितीत आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अजंता प्रोजेक्ट्स कंपनीने विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) ताब्यात घेतलेल्या जमिनीवर नाथनगरच्या भूमिहीन झालेल्या शेतकर्‍यांनी मंगळवारी कब्जा केला. भूसंपादनाचा मावेजा मिळाला नसल्याने ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांच्या संतप्त जमावाने या जमिनीवर नांगर फिरवला. तेथे पेरणीही करून घेतली. ही जमीन शेतकर्‍यांचीच असून, त्यांनी ती पुन्हा ताब्यात घेतली आहे, अशी घोषणा पाटकर यांनी या वेळी केली.

सेझसाठी एमआयडीसीने घेतलेल्या जमिनीचा मोबदला 33 शेतकर्‍यांना अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलन छेडले असून, शाळकरी मुले, वयोवृद्ध लोकही यात सहभागी झाले होते. संतप्त जमावाने प्रकल्पाची भींत पाडण्याचाही प्रयत्न केला. जवळपास दीड तास हे आंदोलन सुरू होते. शेतकर्‍यांचा जमाव काबूत येत नसल्याचे पाहून कंपनी प्रशासनाने पोलिसांना कळवून कुमक मागवली. त्यानंतर पोलिस उपविभागीय अधिकारी कल्पना बारवकर, करमाडचे एपीआय संभाजी बारवकर, संभाजी पवार, चिकलठाण्याच्या एपीआय निर्मला परदेशी यांच्यासह 50 ते 60 पोलिसांचा फौजफाटा सायंकाळपर्यंत घटनास्थळी हजर होता.

मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू असल्याने पोलिसांनी सावध भूमिका घेत दोन्ही बाजूंची गार्‍हाणी ऐकून घेतली. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून एमआयडीसीचे अण्णासाहेब शिंदे आले. पाटकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी कुणाल कुमार आणि एमआयडीसीच्या अधिकार्‍यांसोबत पाटकर चर्चा करणार आहेत.

हा शेतकर्‍यांना भूमिहीन करण्याचा डाव : पाटकर
सेझसारखा खोटा कायदा करून लाखमोलाच्या जमिनी मूठभर उद्योजकांच्या हाती दिल्या जात आहेत. शेतकर्‍यांना भूमिहीन करण्याचा शासनाचा हा डाव आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी टीका केली. या वेळी नांदेडचे ज्येष्ठ समाजसेवक बळवंत मोरे, कल्याण डुगले व बबन काकडे यांची उपस्थिती होती. पाटकर पुढे म्हणाल्या की, मेगासिटी, झालर क्षेत्र, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या नावाखाली लाखो रुपये किमतीच्या शेतकर्‍यांच्या जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. रक्षकच भक्षक झाल्याने एकजुटीने संघर्ष करून ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शेतीस पूरक असे औद्योगिकीकरण न होता शेती व शेतकर्‍यांना मारक असेच ते होत आहे. त्यामुळे हा विकास नेमका कुणाचा, अशी विचारणा करण्याची वेळ आली असल्याचेही पाटकर म्हणाल्या.


प्रकरण काय
एमआयडीसीने सहा वर्षांपूर्वी शेंद्रा एमआयडीसीत अजंता फार्मा प्रोजेक्ट्सच्या सेझसाठी नाथनगरची 290 एकर जमीन घेतली. यातील 130 एकरांच्या 33 मालकांना मोबदला मिळालेला नाही.
आरोप आणि मागण्या
अजंता कंपनीच्या नावे सेझ काढून 100 हेक्टर जमीन बळकावण्यात आली.
खोटी कागदपत्रे बनवून अधिकार्‍यांच्या मदतीने हा प्रकार करण्यात आला आहे.
व्यवहाराबाबत अधिकार्‍यांकडे कागदपत्रे नाहीत, तरीही परवानगी देण्यात आली.
तपास करून दोषींवर कारवाई करावी. भूमिहीन शेतकर्‍यांना भरपाई द्यावी.