आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचा तिढा : नाशिकचा रडीचा डाव, साेडलेले पाणी तासाभरात पुन्हा केले बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरच्या मुळा व निळवंडे धरणातून अनुक्रमे २ हजार व एक हजार क्युसेक वेगाने पाणी जायकवाडीच्या दिशेने रविवारी झेपावले. दरम्यान, नाशिकच्या गंगापूर धरणातून रात्री १०.३० वाजता पाणी सोडण्यात आले, परंतु सर्वपक्षीय आमदारांसह सुमारे ३०० शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीवर चढून धरणात उड्या घेण्याचा पवित्रा घेतला. अखेर आंदोलकांच्या या थयथयाटापुढे नमते घेत प्रशासनाला तासाभरातच विसर्ग बंद करावा लागला. धरणावर कडेकोट बंदोबस्तात विसर्गाची प्रक्रिया सुरू होती.

नगरच्या मुळा व निळवंडे धरणातून रात्री ९ वाजता विसर्ग सुरू झाला आहे. गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी.ए. बिराजदार यांनी ही माहिती दिली. निळवंडे धरणातून १ हजार, तर मुळातून २ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, सोमवारी सकाळी हा वेग वाढवण्यात येणार आहे. पाणीचोरी आणि इतर अनुचित प्रकार रोखण्यासाठी वहनमार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय या भागातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.
आज विसर्गाचा वेग वाढणार : जायकवाडीत साेडण्यात अालेल्या
पाण्याच्या विसर्गाचा वेग सोमवारी वाढवण्यात येणार आहे. मुळा धरणातून सकाळी ६ वाजता चार हजार, तर दुपारी ४ वाजता ७ हजार क्युसेकपर्यंत वेग वाढवला जाईल, असे महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांनी सांगितले.
प्रत्यक्षात ७.५ टीएमसीच हाती
नगर व नाशिकच्या धरणांतून जायकवाडीसाठी १२.८४ टीएमसी पाणी साेडण्यात येणार आहे. तथापि, प्रत्यक्षात यातील ७.५ टीएमसीच पाणी धरणापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या ४.५ टक्क्यांवर पाणीसाठा असलेले जायकवाडी १२ टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. पाणी सोडण्याबाबत नगर व नाशकात सातत्याने बैठका सुरू होत्या. त्यावर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच जलसंपदाचे प्रधान सचिव एस.एम.गवई यांनी सूचना दिल्या होत्या.

आज कॅव्हेट दाखल
नगर, नाशकातून होणारा विरोध पाहता गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडूनही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल होणार आहे. त्यासाठी अॅड. सतीश तळेकर दिल्लीत पोहोचले आहेत. नगर व नाशिककडून दिल्लीतील दिग्गज वकील बाजू मांडणार असल्याचे कळते.
‘कडा’ची आठ पथके
कडा विभागाने अधिकाऱ्यांची ८ पथके पाठवली आहेत. यात चार अधिकारी, शाखा अभियंता व उपअभियंत्याचा समावेश आहे. केटीवेअरची आधीची व पाणी सोडल्यानंतरची पाहणी ते करतील. यात मुळा, प्रवरासाठी चार व नाशिक भागात चार पथके पाठवली आहेत.
सीएमच्या "गृह'वर ठपका नको, मुख्य सचिवांनीच फिरवली सूत्रे
प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद
न्यायालयाच्या आदेशनंतरही नगर व नाशिकच्या जिल्हा प्रशासनांनी पाण्याला आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे खुद्द मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीच सूत्रे हलवली आणि पाणी सुटले. न्यायालयाचा आदेश पाळा असा आदेशच त्यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाला दिला होता.
मंत्रालय स्तरावर रविवारी दिवसभर वेगवान हालचाली झाल्या. जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव एस.एम. गवई यांनी चर्चा केली. शिवाय बंदोबस्त पुरवला नाही असा ठपका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असलेल्या गृह मंत्रालयावर येऊ नये याची खबरदारी क्षत्रिय यांनी घेतली. जायकवाडीत १२.८४ टीएमसी सोडण्यासंदर्भात शुक्रवारीच उच्च न्यायालयाने आदेश दिले. मात्र ४८ तास उलटल्यानंतरही कार्यवाही करण्यात येत नव्हती. नगर व नाशिकच्या प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतल्याने या प्रक्रियेला विलंब होत होता. पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने पाणी सोडणार की नाही यावर दिवसभर चर्चा सुरू होती. रविवारी पाणी सोडले जाऊ नये यासाठी नगर-नाशिकच्या नेत्यांकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळवण्यासाठी हालचाली सुरू होत्या.
पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी मराठवाड्यातील पाटबंधारे विभागाच्या सहा अधिकाऱ्यांनी सकाळपासून गंगापूर धरणावर तळ ठोकला होता. समितीने धरणातील पाणीसाठ्याची आणि परिसराची माहिती घेतली. रविवारी रात्री उशिरापर्यंत ही समिती नाशिकमध्येच होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संपूर्ण आंदोलनाचे PHOTOS