आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father Less Girls Meet His Brother On Bhaubij At Aurangabad

अनाथ मुलीला भाऊबीजेला मिळाली भावंडांची भेट !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आई तुरुंगात गेल्यामुळे अनाथाश्रमात पोहोचलेल्या एका चिमुकलीने ताटातूट झालेली आपली दोन धाकटी भावंडे शोधून काढली आणि त्यांच्यासोबतच भाऊबीज साजरी केली! शहरातील काही संवेदनशील नागरिकांनी मंगळवारी अनाथाश्रमातील मुला-मुलींच्या सान्निध्यात भाऊबीज साजरी केली, तेव्हा ही हृदयद्रावक कहाणी उजेडात आली.

दोन महिन्यांपूर्वी 10 वर्षांची संगीता (नाव बदलले आहे) चिकलठाणा पोलिसांमार्फत सातारा परिसरातील भगवानबाबा बालिकाश्रमात दाखल झाली. दोन धाकट्या भावंडांना शोधून आणा, असा तगादाच तिने आश्रमाच्या व्यवस्थापनाकडे लावला. आश्रमाच्या अधीक्षक कविता वाघ यांनी पोलिसांमार्फत भावंडांचा शोध घेतला, पण उपयोग झाला नाही. मंगळवारी भाऊबीज होती आणि नंदीग्राम कॉलनीत बालिकाश्रमातील मुला-मुलींना भाऊबीज साजरी करण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. भावांशिवाय भाऊबीज कशी साजरी करू? असा प्रश्न संगीताने कविताताईंना विचारला, तेव्हा त्या स्वत:च संगीताच्या दोन भावंडांचा शोध घेण्यासाठी आश्रमाबाहेर पडल्या. तिने दाखवलेल्या भागात त्यांनी शोध घेतला. संध्याकाळी पाच-सात वर्षांची दोन मुले त्यांना दिसली. तीच संगीताची भावंडे होती! ताईला पाहून ती तिच्या गळ्यात पडली. कविताताईंनाही रडू कोसळले.

नंदीग्राम कॉलनीतील भाऊबीजेच्या कार्यक्रमात कविताताईंनी ही कहाणी सांगितली, तेव्हा उपस्थितांचे डोळेही पाणावले. भावांना जवळ घेतलेल्या संगीताच्या चेहर्‍यावरील आनंदही ओसंडून वाहत होता. भाऊबीजेला भाऊ भेटले. संगीतासाठी यापेक्षा मोठी ओवाळणी कोणती असू शकेल?

आईने विकले होते
गरिबी आणि कर्जामुळे संगीताला तिच्या आईने विकले होते. संगीताचा याला विरोध होता. ‘खरेदीदार’ आले त्या दिवशी तिने आरडाओरड केली. प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी पोटच्या पोरीला विकल्याच्या आरोपावरून संगीताच्या आईला अटक केली. यापूर्वीही आईने एका वयस्कर माणसाशी आपले लग्न लावून दिले होते, असे ही चिमुरडी सांगते.

खाऊ भावांसाठी ठेवायची
दसरा-दिवाळीनिमित्त कोणी काही भेट किंवा खाऊ दिला, की संगीता आपल्या हरवलेल्या भावंडांसाठी तो पिशवीत ठेवून द्यायची. आज जेव्हा भावांची भेट झाली तेव्हा तिघेही एकमेकांना घट्ट बिलगून रडत होती. भावांनाही ताई भेटल्याचा अत्यानंद झाला होता. ही भावस्पर्शी कथा ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.